वेळकाढूपणाच्या निषेधार्थ भीमशक्तीचे मुंडण आंदोलन Print

परभणी/वार्ताहर
जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांचे कुठल्याही विभागावर नियंत्रण नसल्याने विविध योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे, अशी टीका भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले.
माता रमाबाई घरकुल योजना राबविण्यात चालढकल, बीपीएलधारकांची हेळसांड, स्वस्त धान्याचा काळाबाजार, निराधारांचे अनुदान, गावागावातील स्मशानभूमीचे वाद, गरिबांच्या झोपडय़ा हटविण्याचे जायकवाडी प्रशासनाचे षड्यंत्र, दलितवस्ती निधीचा अपहार, गायरान जमिनीचे प्रलंबित प्रस्ताव आदी प्रश्नांवर जिल्हा परिषद प्रशासन वेळकाढू धोरण राबवित असे. त्यामुळे दलित मागासवर्गीयांत संतापाचे वातावरण असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. हे सर्व प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रमाबाई घरकुल योजनेची त्वरित अंमलबजावणी न केल्यास महापालिका बंद करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनात सिद्धार्थ कसारे, सतीश भिसे, अरुण लहाणे, चंद्रकांत लहाने, द्वारकाबाई जंगले, सुमन गाडे आदी सहभागी झाले होते.