जालना गणेश फेस्टिव्हलच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण Print

जालना/वार्ताहर
जालना गणेश फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित जालना आयडॉल गायन स्पर्धेत किशोर दिवटे पहिला, तर राहुल कवडे दुसऱ्या व शेखर राखे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. मंगळवारी रात्री येथील फुलंब्रीकर नाटय़गृहात अंतिम फेरीतील या ३ स्पर्धकांनी गायन सादर केले. त्यांच्यासह अन्य विजेत्यांना या वेळी पारितोषिके देण्यात आली. फेस्टिव्हलचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे-पाटील, कार्याध्यक्ष दिनेश फलके, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई भुतेकर उपस्थित होते. स्त्री भ्रूणहत्या विरोधी रॅलीतील प्रथम क्रमांकाच्या देखाव्याचे पारितोषिक सीटीएमके गुजराती विद्यालयास मिळाले. शंकरराव चव्हाण सामाजिक विज्ञान महाविद्यालयास दुसरे, तर दिलासा महिला बचत गटाच्या देखाव्यास तिसरे पारितोषिक मिळाले. मॅरेथॉन स्पर्धेत माधुरी बारहाते पहिली आली. फुटबॉल, चित्रकला, कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांसह सहकार्य करणाऱ्या विविध शाळा, संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार या वेळी करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने जनजागृतीसाठी अलीकडेच जाहीर केलेल्या निर्णयाचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्षा भुतेकर यांच्या हस्ते या वेळी करण्यात येऊन त्याच्या प्रतींचे वाटप उपस्थितांना केले गेले.