हिंगोलीत अवतरले ‘प्रभारी राज’! Print

महत्त्वाचे अधिकारी गैरहजर
हिंगोली/वार्ताहर
जिल्हाधिकारी, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी रजेवर, तर इतर अनेक अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली अशा चक्रात हिंगोली जिल्ह्य़ातील प्रशासकीय कारभारात सध्या ‘प्रभारी राज’ सुरू आहे. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम ८ दिवसांच्या, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल ७ दिवसांच्या रजेवर आहेत. सिंघल आपली रजा वाढविण्याची शक्यता वर्तवली जाते. जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. धांडे सध्या प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. या पाश्र्वभूमीवर बुधवारी आयुक्त कार्यालयाचे आदेश जि. प. कार्यालयात आले असता धांडे यांनी पदभार स्वीकारण्यास सुरुवातीला नकार दिला, परंतु लेखी आदेश मात्र स्वीकारले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांची बदली झाली आहे. अशाप्रकारे महत्त्वाचे अधिकारी रजेवर वा बदली झाली असल्याने गैरहजर असून, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार ‘प्रभारीं’ च्या हाती आहे. या पाश्र्वभूमीवर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल शुक्रवारी (दि. ५) हिंगोलीत येणार असून, जिल्ह्य़ाचा कारभार, तसेच महसूल कर्मचाऱ्यांची कामासंबंधी विशेष आढावा बैठक घेणार आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पन्हाळे यांची बदली झाल्याने उपविभागीय अधिकारी बी. एस. कच्छवे गेल्या ६ महिन्यांपासून या पदाचा प्रभारी पदभार सांभाळत आहेत. हिंगोलीचे तहसीलदार राहुल पाटील यांची बदली झाली. प्रभारी तहसीलदार जी. एल. जाधव यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. सेनगावचे तहसीलदार एन. बी. ठाकूर रजेवर गेल्याने तेथील पदभार नायब तहसीलदारांकडे आहे. पं. स.चे गटविकास अधिकारी पट्टेवाले यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने त्यांचा पदभार हिंगोली पं. स.चे गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्याकडे आहे. सेनगाव तालुक्यातील इतरही विभागात अधिकारी नसल्यामुळे त्या कार्यालयात प्रभारी अधिकारीच पदभार सांभाळत आहेत. एकूणच जिल्ह्य़ात सध्या प्रभारी राज सुरू असून विभागीय आयुक्त जयस्वाल शुक्रवारी महसूल विभागाची आढावा बैठक घेऊन कामांची माहिती घेणार आहेत.