लातुरात सरासरीने ओलांडला सातशेचा टप्पा Print

लातूर/वार्ताहर
हस्त नक्षत्रातील पावसाने शेतक ऱ्यांना दिलासा दिला असून, सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांत जिल्ह्य़ात ७५ मिमी पाऊस झाला. जिल्ह्य़ाची सरासरी ७०४.५० मिमीवर पोहोचली आहे.चाकूर तालुक्यातील शेळगाव मंडलात २४ तासांत तब्बल १३७ मिमी पावसाची नोंद झाली. या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहिले. लातूर शहरात ६४, हरंगुळ ६५, रेणापूर ६०, उदगीर व हेर ६४, नळगीर व नागलगाव ६३, चाकूर ६३ तर घोणसीत ६० मिमी पाऊस झाला. उदगीर तालुक्यात ६१ मिमी पाऊस झाल्यामुळे उदगीर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.
देवणी, जळकोट व रेणापूर या ३ तालुक्यांनी वार्षिक सरासरी पूर्ण केली आहे. भीज पावसामुळे जमिनीत पाणी मुरत असून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. तूर, संकरित ज्वारी या खरीप पिकांना पावसाचा चांगला लाभ झाला. रब्बीच्या पेरणीची चिंताही दूर झाली आहे. जिल्ह्य़ात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे, कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे : लातूर ४७.१३ (५४५.९७), औसा १८ (४९३.१८), रेणापूर ४२.७५ (८०९.७५), उदगीर ६१ (७५२.५२), अहमदपूर ४२.३३ (७६१.२८), चाकूर ५९.६० (७७०.६०), जळकोट ५६ (९६६.३८), निलंगा २१.२५ (५६४.८६),
देवणी ४४.६७(८९३.२७), शिरूर अनंतपाळ २९.६७ (४८७.६४) सरासरी ४२.२४ (७०४.५०).