जालन्यात ३ दिवस पाऊस; वार्षिक सरासरी ४५ टक्केच Print

जालना/वार्ताहर
जिल्ह्य़ात गेल्या ३ दिवसांत पावसाने हजेरी लावली असली, तरी त्यामुळे वार्षिक सरासरी ४५ टक्क्य़ांपर्यंतच पोहोचली आहे. गेल्या ३ दिवसांत वातावरण ढगाळ आहे. मंगळवारी व बुधवारी जिल्ह्य़ाच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. जालना शहरात पावसाची सर येऊन गेली. मंगळवारी जिल्ह्य़ात सरासरी ३२.८३ मिमी पाऊस झाला. परतूर तालुक्यातील सेलगाव परिसरात वीज कोसळून पूजा अशोक जाधव (वय १८) या युवतीचा मृत्यू झाला, तर अन्य चौघी जखमी झाल्या. जिल्ह्य़ात आतापर्यंत ३१२.९४ मिमी पाऊस झाला. एकूण वार्षिक सरासरीशी त्याचे प्रमाण ४५.४७ टक्के आहे. तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : जालना ४९.२८, बदनापूर ४७.३६, भोकरदन ४४.०२, जाफराबाद ४७.५२, परतूर ५६.०७, मंठा ४३.१०, अंबड ४५.०४ व घनसावंगी ३१.०९ टक्के.
आयुक्तांकडून आढावा
दरम्यान, राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ातील स्थितीचा विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने यासाठी काही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांच्यासह जिल्हा पातळीवरील संबंधित अधिकारी उपस्थित होते. थेट जायकवाडीवरून जलवाहिनी टाकण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जालना व अंबड नगरपालिकांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे. टँकर मागणीसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा. चाराप्रश्नासह जिल्ह्य़ातील खरीप पीकस्थितीचा आढावा घेऊन अंतिम पैसेवारी काढण्यासंदर्भात योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेस केल्या.    
पतंगराव कदम उद्या जालन्यात अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम शुक्रवारी (दि. ५) जालना दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जनता दरबार होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
भीमराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या कार्यक्रमात कदम हे जिल्ह्य़ातील पक्ष कार्यकर्त्यांना तालुकानिहाय भेटणार असल्याचे राम सावंत यांनी कळविले आहे.