परभणीत परतीचा दणकेबाज पाऊस Print

परभणी/वार्ताहर
जिल्हय़ात मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ४१.३१ मिमी पाऊस झाला. परतीच्या पावसाने दणकेबाज हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. परतीचा पाऊस असाच आणखी बरसला तर वार्षिक सरासरीचा टप्पाही ओलांडला जाईल, अशी स्थिती आहे.
आतापर्यंत जिल्हय़ात सर्वाधिक सरासरी पाऊस पाथरी तालुक्यात (८७० मिमी) झाला. येथील पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. जिल्हय़ात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ७८.०९ टक्के पाऊस झाला. जिल्हय़ाची वार्षिक सरासरी ७७४.५९ असून आतापर्यंत ६०४.९४ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांत झालेला पाऊस रब्बी पेरणीस उपयुक्त आहे. मध्यम व लघु प्रकल्पातील जलसाठय़ात मात्र अपेक्षित वाढ न झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट अजूनही कायम आहे.जिल्हय़ात सुरुवातीपासूनच थोडय़ा थोडय़ा दिवसांच्या फरकाने किरकोळ पाऊस झाला. या पावसावर खरिपातील सोयाबीन, कापूस, मूग ही पिके तग धरून राहिली. मात्र, कमी पावसामुळे उत्पादनात घट येत आहे. गेल्या १५ दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गेल्या २ दिवसांत परतीच्या पावसाने जिल्हय़ात सर्वत्र हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जलसाठे भरण्यासाठी अजूनही मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे.ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ातही येलदरी धरणात ७ टक्के, तर सिद्धेश्वर धरणात १० टक्के उपयुक्त साठा आहे. येलदरीवर जिंतूर शहरासह अनेक खेडय़ांच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. सिद्धेश्वर धरणावरूनही हिंगोलीसह इतर खेडय़ांना पाणीपुरवठा केला जातो. परभणी जिल्हय़ातील शेतीसिंचन मुख्यत: जायकवाडी, माजलगाव व निम्न लोअर दुधना प्रकल्पावर अवलंबून आहे. जायकवाडीत केवळ १.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, निम्न दुधना व माजलगाव धरणांत शून्य टक्के साठा आहे. परभणीत करपरा व मासोळी हे मध्यम प्रकल्प असून २२ लघु प्रकल्प आहेत. दोन्ही मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. लघु प्रकल्पाची स्थिती अत्यंत नाजूक आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे रब्बी पेरण्यांना सुरुवात होईल.