बीडमध्ये ३४ शाळांना नोटीस Print

बनावट उपस्थिती दाखवून अनुदान लाटले
बीड/वार्ताहर
पटपडताळणीत ५० टक्क्य़ांपेक्षा कमी उपस्थिती आढळून आलेल्या शाळांनी बनावट उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार, गणवेश व इतर सवलतींचा लाभ घेऊन अनुदानाचा गैरवापर केला, असा ठपका ठेवून शिक्षणाधिकाऱ्यांनी ३४ शाळांना शिस्तभंगाबाबत नोटीस बजावली.
जिल्ह्य़ात गेल्या वर्षी ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान महसूल विभागाने पटपडताळणी केली. पडताळणीत ५० टक्क्य़ांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळांवर कारवाईचे सरकारने सुरुवातीलाच जाहीर केले होते. त्यानुसार पटपडताळणीत ५०
टक्क्य़ांपेक्षा कमी उपस्थिती आढळलेल्या जि.प.च्या ११ व संस्थेच्या २३ अशा ३४ शाळा निष्पन्न झाल्या. या शाळांना सरकारकडून दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची तरतूद केली जाते. गुणात्मक शिक्षणासाठी सरकारकडून पटसंख्येनुसार अनुदान दिले जाते.
मात्र, शाळांनी बनावट संख्या दाखवून जास्तीच्या शिक्षकांची नियुक्ती, एकाच विद्यार्थ्यांचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे, अनुदान लाटणे असे प्रकार घडल्याचे दिसून आले.
त्यामुळे जिल्ह्य़ातील ३४ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दहा दिवसांत संबंधित शाळांकडून खुलासा न आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.