दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जबर जखमी Print

कंधार, नायगावातील थरार
नांदेड/वार्ताहर
जिल्ह्य़ातील कंधार-मुखेड व मुखेड-नायगाव रस्त्यांवर पडलेल्या दोन दरोडय़ांमध्ये दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जबर जखमी झाले. दरोडय़ाच्या या घटनांनी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहर व परिसरात पोलिसांची गस्त कागदावरच आहे. वरिष्ठ अधिकारी व अनेक पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव आहे. आपले कोणी काही करू शकत नाही, अशा आविर्भावात अनेक ठाण्यांतील अधिकारी असल्याने शहर व परिसरात चोरी-दरोडय़ाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात ४ जबरी चोरीच्या व मंगळवारी रात्री दरोडय़ाच्या ३ घटना घडल्या. कंधार तालुक्यातल्या फुलवळ येथील गोविंद तेलंग आपल्या गावी मोटरसायकलवरून परतत असताना चोरटय़ांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली व त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम, मोटारसायकल, दागिने असा ऐवज लांबविला. त्यानंतर चोरटय़ांनी मुखेड मार्गावर निपाणी सारवगाव येथे गोविंद शेषराव कल्याणकस्तुरे व नागोराव कल्याणकस्तुरे या दोघांना मारहाण करून त्यांच्याजवळील रोख रक्कम मोटारसायकल असा सुमारे ४० हजारांचा ऐवज लुटला.
रात्री नऊच्या सुमारास या घटना घडल्यानंतर १० वाजता नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडगा-कहाळा रस्त्यावर दत्ता शिंदे या शेतकऱ्याला दरोडेखोरांनी आखाडय़ावरच मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम, मोटारसायकल लांबविली. दरोडेखोरांनी कंधार येथून चोरलेली मोटारसायकल येथे सोडून पलायन केले. दोन तासांनंतर कंधार पोलिसांना व नंतर नायगाव पोलिसांना ही बाब समजली. परंतु पोलिसांनी आवश्यक उपाययोजना न केल्याने चोरटे पसार झाले.
सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई, पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव, उपअधीक्षक किरण चव्हाण, गीता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी सूचना  दिल्या. कंधार व नायगाव पोलिसांनी दरोडय़ाचा गुन्हा नोंदविला.