औरंगपुऱ्यातील दीडशे विक्रेत्यांना तूर्त दिलासा Print

समेटासाठी आज  बैठक
औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगपुरा भाजीमंडईतील दीडशे विक्रेत्यांना महापालिकेने बेकायदा नोटीस देऊन हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात जिल्हा फळ व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या विक्रेत्यांना पुढील आदेश येईपर्यंत हटवू नयेत, असे आदेश न्या. एच. एन. पाटील व न्या. ए. बी. चौधरी यांच्या खंडपीठाने दिले.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून समेट घडवावा, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार उद्या (गुरुवारी) सायंकाळी ५ वाजता बैठक घेतली जाईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट केले.
गेल्या ३०-४० वर्षांपासून भाजीविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या दीडशे जणांना हुसकावून मंडईच्या जागेवर नवीन मॉल बांधण्याच्या उद्देशाने महापालिका अन्याय करीत असल्याबाबत याचिका दाखल केली होती. भाजी विक्रेत्यांना नवीन मॉलमध्ये जागा, त्याचा किराया, करारनामे तसेच बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी जागेवर वीज, पाणी व रस्ते आदी बाबींवर चर्चा करून समेट घडवावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे केली होती. त्या संदर्भात बैठक घेतली जाईल, असे मनपाच्या वकिलाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विनोद पाटील व अ‍ॅड. अभय टाकसाळ यांनी काम पाहिले.