लातूरचा शिल्लक निधी हिंगोलीकडे! Print

पाणलोटाची कामे रेंगाळली
लातूर/वार्ताहर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरच्या प्रश्नांना कोणी वाली नसल्याचे समोर येत आहे. मराठवाडा पाणलोट विकासांतर्गत लातूर जिल्ह्य़ात अखर्चित असलेले १ कोटी ४५ हजार रुपये हिंगोली जिल्ह्य़ाकडे वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००५ मध्ये मराठवाडय़ाच्या पाणलोट विकासासाठी त्यांनी जाणीवपूर्वक निधी दिला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाला हा निधी पाठविला होता. मराठवाडा पाणलोट विकास मिशनची स्थापना यासाठी केली होती. आठ जिल्ह्य़ांसाठी १३९ कोटींची तरतूद केली होती. पैकी १३६ कोटींचा निधी लातूर वगळता बहुतेक जिल्ह्य़ांनी योग्य नियोजन करून खर्च केला. लातूर जिल्ह्य़ात पाणलोट विकासासाठी जी कामे करण्याचे नियोजन केले होते, त्यात अनेक वेळा बदल करण्यात आले. लातूर तालुक्यातील उसाखालील ६०० हेक्टर जमीन होती. त्याला फटका बसू नये म्हणून वारंवार फेरबदल करण्यात येत होते.
या योजनेंतर्गत प्रारंभी शेततळी घेण्याचे ठरले. त्यानंतर हे काम ‘नरेगा’मार्फत करता येईल आणि हा निधी अन्यत्र खर्च करू, असे सांगितले. त्यामुळे या योजनेंतर्गत शेततळी घेण्याचे थांबविण्यात आले. ४५ सेंमी नाला बांधण्याचे काम नियोजित होते. २० नाले झाल्यानंतर उर्वरित नाल्याची निश्चिती होत नसल्यामुळे पैसे पडून राहिले. हा अखर्चित निधी तब्बल १ कोटी ७२ लाख रुपये होता. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह अनुभवी मंडळी जिल्ह्य़ात लोकप्रतिनिधी असतानाही हा पैसा अखर्चित का राहिला? असे पैसे शिल्लक आहेत, हे तरी लोकप्रतिनिधींना माहिती होते का, असे प्रश्न विचारले जात आहेत.बराच कालावधी हे पैसे पडून राहिल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. एस. मोटे यांनी लातूर जिल्ह्य़ाकडे अखíचत निधी आहे. तो अन्य जिल्ह्य़ात वर्ग करावा, असे सहसंचालक कार्यालयाला कळवले. त्यानंतर कृषी आयुक्तांनी १ कोटी ४५ हजार रुपये हिंगोली जिल्ह्य़ासाठी वर्ग केले. एकीकडे मराठवाडय़ाच्या सिंचनाचा अनुशेष ६७ टक्के शिल्लक राहिला असल्याची ओरड मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष करतात, तर दुसरीकडे मराठवाडय़ाच्या विकासात ज्यांनी मोठे योगदान दिले, अशा लातूर जिल्ह्य़ात सिंचनासाठी पैसे खर्च न होता पडून राहतात, हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.