जायकवाडीत पाण्याबाबत ‘वरच्या पुढाऱ्यांना’ राजी करणार Print

मुंबईच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
औरंगाबाद/प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
नगर जिल्हय़ातील भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीशी सल्लामसलत करावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आयोजित बैठकीत घेण्यात आला. जायकवाडीत पाणी सोडण्याविषयी नगर जिल्हय़ातील पुढाऱ्यांची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न बैठकीत करण्यात आला. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडले जाईल, या वक्तव्याचा थोरात यांनी पुनरुच्चार केला.
दरम्यान, बैठकीनंतर जायकवाडी धरणात शुक्रवारी (दि. ५) पाणी सोडले जाईल, अशी माहिती बाहेर आल्याने नवाच घोळ निर्माण झाला होता. वास्तविक, अकोले, संगमनेर व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात पिण्यासाठी दि. ५ला पाणी सोडावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जायकवाडीत किती पाणी सोडायचे, हे ठरल्यानंतरच निळवंडे व भंडारदऱ्यातील पाण्याचे नगर जिल्हय़ातील आवर्तने किती, याचे नियोजन केले जाणार आहे. भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे थोरात यांनी मुंबईहून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पाणी सोडण्यापूर्वी कालवा समितीच्या सदस्यांना विश्वासात घेतले जावे व त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय जायकवाडीचा निर्णय घेतला जाऊ नये, अशी चर्चा बैठकीत झाली. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक मानसिकता निर्माण झाल्याचा दावा थोरात यांनी केला.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे गेल्या दोन दिवसांत जायकवाडी जलाशयात नव्याने ११ दलघमी पाणी आले. तथापि, जेथून पाणी सोडले जाणार आहे, त्या धरणापासून जायकवाडीपर्यंत ११३ किलोमीटरचे अंतर असल्याने नदीचे पात्र ओले असेपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उशिरा पाणी सोडले तर ते पुरेशा क्षमतेने जलाशयापर्यंत येणारच नाही. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पातळीत वाढ करायची असेल तर याबाबतचा तातडीने निर्णय व्हावा, अशी मागणी केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई येथे झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे पुढे आले आहे.