‘भावनांचे उत्स्फूर्त चित्र कवितेत उमटणे गरजेचे’ Print

हिंगोली/वार्ताहर
कविता ही सांकेतिक अलंकारात अडकून पडता कामा नये. भावनांचे उत्स्फूर्त चित्र कवितेत उमटवणे गरजेचे असते. आजकाल अनाहूत विषय कवितेत मांडून केवळ कविता गायन अनुकूल करण्याचा प्रयत्न कवी करीत आहेत. केवळ गायन अनुकूलता म्हणजे कविता नव्हे, असे मत प्रसिद्ध चित्रकार भ. मा. परसवाळे यांनी व्यक्त केले. येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कवी कुसुमाग्रज अध्यासन केंद्र व रेनबो कॉम्प्युटर्स यांच्या वतीने काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील पारितोषिक समारंभात परसवाळे बोलत होते. विभागीय संचालक प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे, कवी प्रा. विलास वैद्य, प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर, प्राचार्य विजयकुमार कांबळे उपस्थित होते. नांदेड विभागातील हिंगोली, नांदेड, परभणी व लातूर येथील कवींसाठी खुली काव्यवाचन स्पर्धा हिंगोलीत झाली. स्पर्धेत ५० कवींनी भाग घेतला. यात शीतवंत वाढवे, हर्षवर्धन परसवाळे व दत्तात्रय स्वामी यांनी पहिले ३ क्रमांक, तर उत्तेजनार्थ बक्षिसे सारंग थळपते,  राजकुमार नायक यांनी मिळविली.