बार्शी रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीस ८० लाखांचा निधी Print

बीड/वार्ताहर
शहरातील बार्शी रस्त्यावरील मोठय़ा पुलाची दुरुस्ती करण्यासाठी ८० लाख ५४ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या पुलाचे नूतनीकरण केले जाणार आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला.
पुलाची दुरुस्ती अनेक वर्षांत झाली नव्हती. लोकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष दिले व निधी मंजूर करून घेतला.
केंद्रीय भूजल परिवहन मंत्रालयाने गेल्या मार्चमध्ये या कामाला मंजुरी दिली. त्यानंतर नागपूर येथील इंजि. सुहास भावे यांना हे काम देण्यात आले. येत्या मार्चपर्यंत काम पूर्ण करायचे आहे.
पुलाखालील सर्व यंत्रणा बदलण्यात येणार आहे. पुढील १५ वर्षे या पुलाला कोणताही धोका होणार नाही, अशा पद्धतीने नूतनीकरण करण्यात येईल.