तंटामुक्तीतूनच गावाचा विकास- आमदार सातव Print

हिंगोली/वार्ताहर
आपसातील भांडण-तंटय़ामुळे कोर्टकचेरीच्या कामात पैसा-वेळ वाया जातो. गावात अशांतता निर्माण होऊन गाव विकासापासून वंचित राहते. मात्र, तंटामुक्तीतून गावाचा विकास साधता येतो. यासाठी गाव तंटामुक्तीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार राजीव सातव यांनी केले.
कळमनुरी तालुक्यातील उमरा, हातमाली व शिवणी (खुर्द) ग्रामपंचायतींच्या वतीने तंटामुक्ती गाव समिती कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे व पोलीस पाटील मेळाव्याचे उद्घाटन आमदार सातव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, दिलीप देसाई, सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, सरपंच वर्षां अंभोरे आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक माणिक पेरके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने आमदार सातव यांच्या हस्ते पेरके यांचा सत्कार करण्यात आला.