‘सामाजिक प्रगतीचे चक्र सेवेतूनच गतिमान होईल’ Print

औरंगाबाद/वार्ताहर
समाजाच्या प्रगतीचे चक्र सेवाकार्यामुळेच गतिमान होईल. त्यामुळे देशात पुन्हा सुवर्णयोग अवतरेल, असे प्रतिपादन संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष प्रकाश पाठक यांनी केले.
डॉ. दिवाकर कुलकर्णी व सविता कुलकर्णी या दाम्पत्यास अमरावती येथील प्रज्ञा प्रतिष्ठानच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाठक यांनी माध्यमांतून गुन्हेगारी, चंगळवाद, दहशतवाद अशा नकारात्मक व निराशा निर्माण करणाऱ्या विषयांनाच मोठी प्रसिद्धी मिळते. मात्र, समाजात अनेक चांगली विधायक कामे व घटना घडत असतात, त्यांनाही ठळक प्रसिद्धी देऊन पुढे आणले तर समाजाचे प्रगतीचे चक्र पुढे सरकेल व भविष्यात प्रगतीचा सुवर्णकाळ दिसू लागेल, असे सांगितले. डॉ. दिवाकर कुलकर्णी हे औरंगाबाद येथे गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र चालवतात, तर सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या वतीने सविता कुलकर्णी या महिलांसाठी विविध उपक्रम राबवतात. पुरस्कार समारंभात डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी समाजसेवी संस्थांनी गगनचुंबी प्रगती करण्यापेक्षा क्षितिजसमांतर प्रगती करून अधिकाधिक उपेक्षित बांधवांना सोबत घेण्यासाठी सेवाकार्याचे मोठे जाळे विणण्याची गरज आहे, असे नमूद केले.