ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारीसाठी स्वच्छतागृहाचे प्रमाणपत्र बंधनकारक Print

बीड/वार्ताहर
ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यास त्याने स्वच्छतागृह बांधल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून स्वच्छतागृह बांधण्यास मुदत देऊनही त्याचे बांधकाम न करणाऱ्यांना आता थेट निवडणुकीलाच मुकावे लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर काहीजण सरपंच व ग्रामसेवकांकडून असे प्रमाणपत्र मिळविण्याचा आटापिटा करीत आहेत. परंतु उमेदवारांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याची तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिली आहे. त्यामुळे आता गावपातळीवर ग्रामसेवक, सरपंचासह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हय़ात दुसऱ्या टप्प्यामध्ये ७०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात प्रमाणपत्रासह स्वच्छतागृह बांधून त्याच वापर सुरू असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रामुळे ग्रामीण भागातील अनेकांची अडचण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून विभागीय आयुक्तांनी वेळोवेळी आवाहन करूनही जिल्हय़ातील ३ हजार २४९ ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छतागृह बांधले नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली होती. मात्र, इतक्या मोठय़ा प्रमाणात सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले, तर फेरनिवडणुका घेण्याची वेळ येईल, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने हा निर्णय बासनात गुंडाळला. मात्र, आता पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांना स्वच्छतागृहाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. ऐनवेळी असा निर्णय झाल्याने आता गावपातळीवरील पुढारी, सरपंच, ग्रामसेवकांकडून बनावट प्रमाणपत्र घेऊन वेळ निभावून नेण्याच्या प्रयत्नात आहेत.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी एका आदेशाद्वारे स्वच्छतागृहाचे बनावट प्रमाणपत्र दिल्यास संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता स्वच्छतागृह नसणाऱ्यांना निवडणुकीपासून मुकावे लागणार आहे.