परभणी बाजार समितीतर्फे आता शेतीमाल तारण कर्ज Print

परभणी/वार्ताहर
शेतीमालाचे बाजारभाव कोसळल्यानंतर शेतकरी आपले उत्पादन विकतो तेव्हा त्याला समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे परभणी बाजार समितीने शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही, तोवर शेतीमालाची साठवणूक करण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे.
शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी बाजारपेठेचा अपेक्षित लाभ मिळत नाही. शेतीमालाचे बाजारभाव कोसळलेले असतात, तेव्हा आवक वाढते व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. तसेच बाजारभाव वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे विक्रीस शेतीमाल नसतो या दुष्टचक्रात शेतकरी कायम फसलेला असतो. शेतीमालाला बाजारात भाव नसेल, तर त्याची साठवणूक करून शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने कर्जाऊ रक्कम घेता येईल. योग्य भाव येईल तेव्हा शेतकरी आपल्या शेतीमालाची विक्री करू शकतील. येथील बाजार समितीने राज्य कृषी पणन मंडळाकडे (पुणे) ५० लाख रकमेचा कर्ज प्रस्ताव दाखल केला असून, तूर्तास समितीने ही योजना स्वनिधीतून चालू केली आहे.
राज्य वखार महामंडळाच्या गोदामात या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल ठेवल्यानंतर शेतकऱ्यास वखार पावती देण्यात येईल. त्यावर पोत्यांची संख्या, मालाचे अंदाजे वजन, प्रतिक्विंटल दर व त्या मालाची एकूण किंमत नमूद केली जाईल. तेवढय़ा किमतीचा विमा वखार महामंडळ उतरवील ही पावती बाजार समिती कार्यालयात जमा केल्यानंतर त्या पावतीच्या आधारे तूर, सोयाबीन, मूग, उडीद, चना या मालावर एकूण प्रचलित दर किमतीच्या ७० टक्के कर्ज सहा टक्के व्याजदराने १८० दिवसांकरिता बाजार समितीच्या वतीने देण्यात येईल.
ज्वारी, बाजरी, गहू, मका या मालावर एकूण किमतीच्या ५० टक्के कर्ज किंवा ५०० रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी रकमेस ६ टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येईल. कर्ज रकमेची ६ महिन्यांत परतफेड करून तारण माल ताब्यात न घेतल्यास या शेतीमालाची बाजार समितीतर्फे विक्री केली जाईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती आमदार संजय जाधव, उपसभापती आनंद भरोसे, सचिव सुरेश तळणीकर यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.