‘सजग’तर्फे २ डिसेंबर रोजी ‘सून संमेलन’ Print

औरंगाबाद/प्रतिनिधी
‘सजग महिला संघर्ष समिती’च्या वतीने २ डिसेंबर औरंगाबादेत ‘सून संमेलन’ घेतले जाणार आहे. या संमेलनाला राज्यभरातून ‘सुना’ उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात राज्यातील काही ‘सजग सुनांचा’ सत्कारही करण्यात येणार आहे. तापडिया नाटय़गृहात सकाळी ११ वाजता ‘सून संमेलना’चे उद्घाटन होईल. समारोप सायंकाळी ५ वाजता होईल. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर गटचर्चा होतील. समारोपाच्या सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त होईल. सजग महिला संघर्ष समितीतर्फे यापूर्वी २४ जून २०१२ रोजी ‘सासू संमेलन’ घेतले होते. या संमेलनात सहभागी सासूंकडून प्रश्नावली भरून घेतली होती, त्यातूनही काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आले. त्याच मुद्यांवर आधारित काही प्रश्न घेऊन २ डिसेंबरला सून संमेलन घेण्यात येणार आहे.  सासू-सुनेच्या संबंधात संपूर्ण कुटुंबाचे ‘स्वास्थ’ अवलंबून असते. या नात्यातील गुंतागुंत समजून घेणे, त्यावर मात कशी करता येईल याचा विचार व्हावा, असा संमेलनाचा उद्देश आहे. ‘सासू-सून’ या नात्यावर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. या मालिका समाजामध्ये वाईट वातावरण तयार करतात.पण या मालिकांमुळे कुटुंबातील वातावरण कलुषित होत आहे. याचाही विचार संमेलनात करण्यात येणार आहे.