तीन हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविणार Print

वडवणीत ३१ वसतिगृहे सुरू
बीड/वार्ताहर
वडवणी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी १ नोव्हेंबरपासून तालुक्यात ३१ ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात आली. जवळपास ३ हजार विद्याथ्र्र्याचे स्थलांतर थांबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तालुक्यात ४० हजार ऊसतोड कामगारांचे प्रतिवर्षी स्थलांतर होते. या कामगारांसोबत त्यांच्या पाल्यांचेही स्थलांतर होते. शालेय विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. या वर्षी वडवणी तालुक्यात पहिल्या टप्प्यात ३१ वसतिगृहांना मान्यता देण्यात आली. या वसतिगृहात १ हजार ३२९ मुले, तर १ हजार १६८ मुली अशा एकूण २ हजार ४९७ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. १ नोव्हेंबरपासून वसतिगृहे सुरू झाली आहेत. वीस व त्यापेक्षा जास्त मुले असणाऱ्या ठिकाणी ही वसतिगृहे सुरू केली आहेत. शालेय व्यवस्थापन समिती वसतिगृहाचे नियंत्रण ठेवणार आहे. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना दोन वेळा जेवण तसेच पाण्याची सुविधा, प्रसाधनगृह असणार आहे.
प्रत्येक वसतिगृहाच्या ठिकाणी एका शिक्षकाची अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत मुलांचे शिक्षकाकडून अभ्यासवर्ग चालवण्यात येणार आहेत. पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह असून वसतिगृहात मुलींची स्वतंत्र व्यवस्था करायची आहे. त्यांचे नातेवाईक सांभाळण्यास तयार असतील तर मुलींची स्वतंत्र व्यवस्था करायची आहे. वडवणी गटशिक्षण कार्यालयाने शालेय व्यवस्थापन समितीकडून प्रस्ताव घेतले आहेत. ही वसतिगृहे ५ ते ६ महिने चालणार आहेत.