दिग्गजांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर बुलडोझर! Print

बीडमध्ये कारवाईचा धडाका
बीड/वार्ताहर
सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याच्या बाजूच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून दोन-तीन मजली इमारती बांधणाऱ्या दिग्गज पुढाऱ्यांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर दोन दिवस बुलडोझर फिरवून रस्ता मोकळा करण्यात आला. माजलगावातील अतिक्रमण हटवल्यानंतर आता बीडसह इतर शहरांतील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी जनतेच्या तक्रारीनंतर माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंकडील १०० फुटांपर्यंतची अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला.
महिनाभराच्या संघर्षांनंतर अखेर अतिक्रमणांवर बुलडोझर फिरला. माजी आमदार डी. के. देशमुख व मोहनराव सोळंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक डक, माजी नगराध्यक्ष नासेर खान पठाण या दिग्गजांसह अनेक विद्यमान व माजी नगराध्यक्ष, विविध पक्षांचे दिग्गज पुढारी यांनी बांधलेल्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. साठपेक्षा जास्त इमारती पाडण्यात आल्या. कोणत्याही दबावाला न जुमानता जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी केलेली कारवाई आतापर्यंतच्या इतिहासातील अतिक्रमण हटावमधील सर्वात मोठी कारवाई ठरली.
केंद्रेकर यांच्या कामाच्या झपाटय़ामुळे प्रशासकीय यंत्रणाही गतिमान झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेचा दबदबाही वाढला आहे.
माजलगावनंतर आता जिल्ह्य़ातील सर्वच ठिकाणची अतिक्रमणे काढण्याबाबत जनतेतून मोठय़ा प्रमाणात मागणी वाढत आहे.
बीड शहर, धुळे, सोलापूर मार्गावर चौसाळा गावात, नेकनूर, अंबाजोगाई, गेवराई शहरांत अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्यामुळे आता सर्वच ठिकाणच्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरणार हे निश्चित झाल्यामुळे आता अतिक्रमणधारकांच्या उरात धडकी भरली आहे.