अपघातामध्ये बसचे नुकसान करणाऱ्या टेम्पोचालकाला जामीन Print

औरंगाबाद/प्रतिनिधी
एस.टी. बसला समोरून उजव्या बाजूने टेम्पोची धडक बसून बसचा पत्रा सुमारे १० फूट उचकटला गेला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारात बसमधील दोन महिलांसह १० प्रवासी जखमी झाले. छावणी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून टेम्पोचालकास मंगळवारी दुपारी अटक केली. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
शेख रईस शेख रफिक (वय २७, दौलताबाद) असे या चालकाचे नाव आहे. शिरपूर-धुळे (एमएच २० बीएल १३९४) ही एस.टी. बस दौलताबादजवळील आपटीमंडी येथे आली असता समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच ०४ बीजी ९४३३) बसला उजव्या बाजूने धडक दिली. त्यात बसचा पत्रा १० फूट उचकटला गेला.
या अपघातात बसमधील दोन महिलांसह दहा प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक सुभाष उमराव दुरंगे (वय ३४, शिरपूर, धुळे) यांनी फिर्याद दिली.