अखंडित विजेसाठी आता ‘थर्मोव्हिजन कॅमेरा’ Print

जीटीएलची सुविधा
औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरवासीयांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सेवा देण्यासाठी जीटीएल कंपनीने विविध प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘पॉवर ऑन व्हील’च्या यशस्वी प्रयोगानंतर आता ‘थर्मोव्हिजन कॅमेरा’ची सुविधा कंपनीने उपलब्ध केली आहे.
थर्मोव्हिजन कॅमेऱ्याद्वारे वीज वाहिन्या, वीज उपकरणातील बिघाड शोधणे जास्त सुकर होणार आहे. शहरात ११ व ३३ केव्ही वीज वाहिन्यांचा विस्तार मोठय़ा प्रमाणात आहे. या वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तो शोधण्यात वेळ लागतो. मात्र, या कॅमेऱ्याद्वारे दृष्टीस सहजरीत्या न दिसणारे तांत्रिक बिघाड निदर्शनास येतात. तसेच रोहित्रातील उष्णतेच्या वाढीची नोंदही हा कॅमेरा अचूक घेतो. वीज वाहिन्यांवरील पिन इन्शुलेटर व डिक्स इन्शुलेटरमधील, तसेच ए.बी. स्वीच, डी. पी. बॉक्समधील बिघाडही सहजरीत्या या कॅमेऱ्यात नोंदविला जातो. हा कॅमेरा वीज उपकरणांची ‘एक्स-रे’ मशीनप्रमाणे नोंद घेत असल्याने उपकरणांची दुरुस्ती व देखभाल करणे सोयीचे जाते. रात्रीच्या वेळी, तसेच अतिसूर्यप्रकाशातही रोहित्र व वाहिन्यांमधील तांत्रिक बिघाड शोधण्यात या कॅमेऱ्याची मदत होते.
वाहिन्यांमध्ये, तसेच रोहित्रांमधील तापमानात वाढ झाल्यास प्रवाह बंद होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, भविष्यात उद्भवणारा बिघाड कॅमेऱ्यामुळे आधीच समजतो. त्यामुळे बिघाडाची पूर्वसूचना आधीच मिळाल्याने त्वरित ते काम हाती घेऊन गैरसोय टाळली जाईल, असे देखभाल व दुरुस्ती विभागाचे प्रमुख सय्यद शहा यांनी या कॅमेऱ्याची माहिती देताना सांगितले. शहरात सध्या दोन कॅमेरे कार्यरत असून ‘थर्मोव्हिजन कॅमेऱ्या’चा वापर वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावाही शहा यांनी केला.