समर्थ कारखान्यास राष्ट्रीय पुरस्कार जाहीर Print

जालना/वार्ताहर
राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार येथील समर्थ सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला.रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या ८ डिसेंबरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
तीस वर्षांपूर्वी सन १९८२ मध्ये सुरू झालेल्या व अंबड, घनसावंगी, जालना तालुक्यांतील २९९ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या समर्थ कारखान्याला या पूर्वी सवरेत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, तांत्रिक क्षमता, उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन, उत्कृष्ट आर्थिक मापदंड आदी पुरस्कार मिळाले. ११९ सहकारी व ५१ खासगी सहकारी साखर कारखान्यांमधून ‘समर्थ’ची झालेली निवड आनंददायी असल्याचे मत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी व्यक्त केले.
सभासद विमा योजना, ऊसबेणे व खतवाटप, मातीपरीक्षण प्रयोगशाळा, माफक दरात साखर वाटप, कर्मचाऱ्यांसाठी सहकारी पतसंस्था असे उपक्रम कारखान्यांमार्फत सुरू आहेत. सर्व विभागाचे संगणकीकरणही झाले आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाते. कारखान्यात १ हजार १६ अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. शिस्तबद्ध व उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया टोपे यांनी व्यक्त केली.