ऐन दिवाळीत शहर बस वाहतुकीवर संक्रांत Print

लातूर मनपाचा आडमुठेपणा
लातूर/वार्ताहर
शहर बसवाहतूक बंद करण्याची नोटीस संबंधित कंपनीच्या मालकाने अखेर लातूर महापालिकेला दिल्याने खळबळ उडाली. ऐन दिवाळीत मनपाच्या आडमुठय़ा धोरणामुळे शहर बसवाहतूक सेवा बंद होणार आहे. परिणामी जवळपास १० हजार प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
मनपाने कराराप्रमाणे तिकीट दरवाढ न दिल्याने शहर बसवाहतूक जुन्याच दराप्रमाणे करणे आता शक्य नाही, असे सांगत गेल्या ३१ ऑक्टोबरला कंपनी मालकाने वकिलामार्फत नोटीस बजावली. परंतु मनपा आयुक्तांनी दरवाढीस नकार दिल्याने कंपनीचे मालक युवराज पन्हाळे यांनी येत्या १२ नोव्हेंबरपासून शहर बसवाहतूक बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. शहर बसवाहतुकीवर असे बॅनर लावण्यात आले आहेत.
तत्कालीन नगरपालिका व शहर बसवाहतुकीचे मालक पन्हाळे यांच्यात भाडय़ाच्या दरवाढीसंदर्भात करार झाला होता. डिझेलचे दर वाढल्यास १५ दिवसांत भाडेवाढ करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेने स्वीकारली होती. याची अंमलबजावणी करण्याचे काम आता मनपावर आले आहे. हा करार १० वर्षांसाठी आहे. आतापर्यंत डिझेल व पार्किंगच्या भाडय़ापोटी पन्हाळे यांचे ९० लाखांचे नुकसान झाले. सेवा सुरू झाल्यापासून डिझेलचे भाव जवळपास १८ रुपयांनी वाढले. पण मनपाने याची दखल घेतली नाही. पन्हाळे यांच्या नोटिशीनंतर मनपात खळबळ उडाली. एकीकडे पुण्यात धूमधडाक्यात बस डे साजरा केला जातो, तर लातूरमध्ये शहर बस वाहतूक सेवा बंद करण्याची वेळ आली आहे. मनपा आयुक्त रुचेश जयवंशी कोणत्या कारणामुळे भाडेवाढ करीत नाहीत, हे न उलगडणारे कोडेच आहे. ऐन दिवाळीत सिटीबस बंद होणार म्हणून प्रवासीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.