प्रवाशांचे दिवाळे अन् ‘ट्रॅव्हल्स’ची दिवाळी! Print

गर्दीच्या हंगामाचे अनर्थकारण
प्रदीप नणंदकर, लातूर
दिवाळीची सुटी पडली की, अनेकांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागतात. परंतु एस. टी. मंडळाच्या बसेस पुरेशा संख्येने उपलब्ध नसल्यामुळे गावाकडे जाणारी मंडळी खासगी वाहनांचा आश्रय घेतात. परंतु खासगी वाहतूक करणारे प्रवाशांना नेमके खिंडीत पकडून त्यांची लूट करण्याचे काम राजरोस करीत आहेत. दामदुपटीहून अधिक रकमेची लूट होत असली, तरी गर्दीच्या हंगामात अन्य काही पर्याय नसल्याने निमूटपणे स्वीकारणे कात्रीत सापडलेल्या प्रवाशांना भाग पडते.
लातूरहून मुंबईला जाण्यास एरवी ५०० ते ६०० रुपये लागतात. परंतु दिवाळीच्या हंगामात मात्र वाढत्या गर्दीचे कारण पुढे करीत थेट १५०० ते २००० हजार रुपये आकारण्याचा सपाटा खासगी वाहनचालक लावतात. अगदी औरंगाबादला जाण्यासाठीही या काळात दुप्पट भाडे वसूल केले जाते. या आर्थिक लुटीत सर्वसामान्यांची मात्र मोठी परवड होते. परंतु दिवाळीतली दोन-तीन दिवस सुट्टी आणि पुन्हा कामाच्या ठिकाणी परतण्याची घाई यामुळे जादा रक्कम मोजण्यावाचून चाकरमान्यांकडे दुसरा पर्यायही नसतो, असे हे कधी न संपणारे चक्र आहे.
परिवहन खात्याचा कारभार प्रवाशांच्या अपेक्षेनुसार होत नाही, तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार एस. टी. गाडय़ांची संख्याही वाढवली जात नसल्यामुळे खासगी वाहनधारकांचे फावले.
लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी परिवहन खात्याने ट्रॅव्हल्सना परवाने दिले. हे परवाने देताना त्यांच्यासाठी विशिष्ट नियम केले गेले. मात्र, प्रवाशांकडून भाडे आकारण्यासंबंधी फारशा अटी टाकल्या गेल्या नाहीत. प्रवासी आपल्याकडे आकर्षित व्हावेत, या साठी खासगी ट्रॅव्हल्सने आपल्या सेवेचा दर्जा सुधारला व एस. टी. महामंडळापेक्षा तिकीट दरात फारसा फरक ठेवला नाही. त्यामुळे खासगी ट्रॅव्हलकडे गर्दी वाढत गेली व ग्राहकांना त्यांच्या सेवेची सवय लागली.
दिवाळीच्या सुटीत मुंबई, पुणे व अन्य भागांतील लोकांना आपल्या गावी परतण्याचे वेध लागतात. आपल्या जाण्या-येण्याचे आरक्षण करण्यासाठी म्हणून ही मंडळी १५ दिवसांपासूनच ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात खेटे घालतात. मात्र, तिकीट बुकिंग फुल्ल झाल्याचे सांगत शेवटच्या टप्प्यात दुप्पट ते अडीचपट रक्कम आकारून ग्राहकांची अडवणूक केली जाते. दिवाळीत गावी गेल्यावर पुन्हा वेळेवर नोकरीच्या ठिकाणी परतायचे असते. त्यामुळे लोक दोन पैसे खर्च झाले तरी मागे-पुढे पाहत नाहीत. एरवीच्या दरापेक्षा थोडेफार जास्त पैसे गेले तरी त्याची फारशी ओरड होत नाही. मात्र, आता पुण्यासाठी ३०० रुपये तिकीट असताना दिवाळीच्या सणात तब्बल ७५० रुपये आकारले जात आहेत. दिवाळीच्या सुटीतील गर्दी लक्षात घेऊन दहा दिवस हे दर लावले जातात. ग्राहकांची लाखो रुपयांची लूट अशा माध्यमातून केली जाते. पुण्या-मुंबईला जिल्ह्य़ातून सुमारे ७५ ट्रॅव्हल्सची ये-जा होते. रोजचे किमान ३ हजार लोक या वाहनाने प्रवास करतात. दिवाळीच्या निमित्ताने या मंडळींना खिंडीत पकडून त्यांचे दिवाळेच काढले जाते. या बाबीकडे कोणाचे लक्ष गेले तर त्यांच्याकडून दहा-वीस हजारांचा हप्ता घेऊन प्रकरण मिटवले जाते. प्रवाशांनी तक्रार करायची तरी कोणाकडे? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.