युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप Print

परभणी/वार्ताहर
चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याप्रकरणी परभणीतील क्रांतिनगर येथे शेख लतीफ शेख नबी व शेख अन्वर शेख चाँद या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
परभणीतील क्रांतिनगर येथील जुबेरखान सत्तारखान पठाण यांचा गेल्या वर्षी १५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी वर्मानगर मैदानात निर्घृण खून झाला होता. उसने दिलेले पैसे का मागितले, या कारणावरून शेखने चाकूने जुबेरखान याच्यावर वार केले. या कामी शेख अन्वर याने मदत केली. या प्रकरणी सत्तार खान यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात या दोघा आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास करून कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. वालचाळे यांनी  आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.