मराठवाडय़ातील ९० महाविद्यालयांची संलग्नता पणाला! Print

मूलभूत शैक्षणिक सुविधांचा दुष्काळ
औरंगाबाद/प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
मराठवाडय़ातल्या सुमारे ९० महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा नाहीत. काही ठिकाणी इमारती नाहीत. काही ठिकाणी क्रीडांगणे नाहीत, तर बऱ्याच ठिकाणी प्रयोगशाळादेखील नाहीत, अशा महाविद्यालयांची प्रतवारी ठरविल्यानंतर ४० टक्के गुणांपेक्षा कमी असणाऱ्या महाविद्यालयांना केवळ संधी म्हणून एक वर्षांचीच संलग्नता कशीबशी मिळू शकेल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास या महाविद्यालयाच्या संलग्नता टप्प्या-टप्प्याने काढून घेतल्या जातील, असा निर्णय विद्या परिषद बैठकीत घेण्यात आला. या वर्षांपासून पीएच. डी.धारक विद्यार्थ्यांना नवीन नियमावलीही तयार करण्यात आली असून, त्यास विद्या परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मराठवाडय़ातील काही महाविद्यालयांमध्ये ना शिक्षक आहेत, ना वर्गखोल्या. विद्यापीठाअंतर्गत १० महाविद्यालयांची तपासणी करण्यास गेलेल्या समितीला काही धक्कादायक वास्तवाला सामोरे जावे लागले. १५ बाय १५ पत्र्याच्या शेडमध्ये ९ वर्ग भरविले जातात. महाविद्यालयाला प्रयोगशाळाच नाही. विद्यार्थी आले नाहीत आणि शिक्षक दिसलेच नाही, असे चित्र पाहावयास मिळाले. शैक्षणिक विद्या परिषदेत हा अनुभव महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागाचे संचालक एम. एस. शिनगारे यांनी सांगितला. हा अनुभव परिषदेत सांगितल्याचे त्यांनीच पत्रकार बैठकीत नंतर स्पष्ट केले.
महाविद्यालयांची प्रतवारी ठरवून ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण असणाऱ्या महाविद्यालयांनाच संलग्नता दिली जाते. या शैक्षणिक वर्षांत ज्या महाविद्यालयांचे गुण कमी आहेत, अशा महाविद्यालयांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतरच्या वर्षांत अशा महाविद्यालयांना सुधारणेसाठी एक वर्षांची संधी दिली जाईल. त्यात सुधारणा न झाल्यास संलग्नता काढून घेतली जाईल. विद्या परिषदेच्या आजच्या बैठकीत संशोधन केंद्रासाठीच्या नोंदणीचे प्रारूप मंजूर करण्यात आले. हे प्रारूप कसे असावे याविषयीची समिती नेमण्यात आली होती. तसेच पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम तयार करण्यात आले आहे. यापुढे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाची उपयोगिताही तपासली जाणार असून उद्दिष्टानुरूप प्रकल्प अहवालांचे मूल्यमापन होणार आहे.