महामार्ग पोलिसांची तऱ्हा Print

वाहने दोन, चालक एकच!
नांदेड/वार्ताहर
नियोजनाचा अभाव, मुख्य उद्देशाला हरताळ, वाहनचालकांची आर्थिक पिळवणूक हाती घेऊन कार्यरत असलेल्या महामार्ग पोलिसांकडे वाहने दोन असली, तरी चालक मात्र एकच आहे! नांदेडचे महामार्ग पोलीस केवळ भोकर विधानसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित असल्याचे समोर आले आहे.
महामार्गावर वाहनचालकांना आवश्यक सुरक्षा मिळावी, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, रस्त्यावरच्या गुन्हेगारीवर अंकुश राहावा, या मूळ उद्देशाने महामार्ग पोलिसांची स्थापना झाली. गृह विभागाच्या दप्तरी महामार्गावर नोकरी म्हणजे ‘साइड ब्रँच’ मानली जात असली तरी याच ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी मोठय़ा आर्थिक उलाढाली होतात. नांदेडमध्ये महामार्ग पोलिसांच्या दोन स्वतंत्र शाखा आहेत. भोकर मतदारसंघात येणाऱ्या भोकरफाटा व बारड येथे महामार्ग पोलिसांच्या शाखा कार्यरत आहेत. पण या दोन्ही शाखांकडून गेल्या अनेक वर्षांत कोणतीही दखलपात्र कारवाईच झाली नाही.
भोकरफाटा येथे ३ अधिकारी, ३० कर्मचारी व ६ चालकांची पदे मंजूर आहेत. रुग्णवाहिका व गस्त घालण्यासाठी वाहन उपलब्ध आहे. दोन वाहने उपलब्ध असली, तरी चालक मात्र एकच आहे. केवळ रस्त्यावरची वाहने अडवणे, कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली पैसे उकळणे हा एकमेव प्रकार सध्या सुरू आहे. भोकर फाटय़ाप्रमाणेच बारड येथील महामार्ग पोलिसांचीही कामाची पद्धत सारखीच आहे. गेल्या अनेक वर्षांत महामार्ग पोलिसांनी रस्त्यावरच्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले नाही. रस्त्यावर होणाऱ्या वाटमारी प्रकरणातील एकाही आरोपीला अटक झाली नाही. सहज उपलब्ध असेल तर रुग्णवाहिका घेऊन जखमींना रुग्णालयात नेण्याचे सत्कार्य पार पाडले असले तरी अन्य कामांच्या बाबतीत मात्र आनंदीआनंद आहे.
नांदेड जिल्हा आंध्र-कर्नाटक सीमेवर आहे. महामार्ग पोलिसांची शाखा नरसी येथे कार्यरत होती. त्यामुळे बिलोलीमार्गे आंध्र प्रदेशात जाणाऱ्या व देगलूरमार्गे कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यांवर काहीअंशी सुरक्षा होती. पण नरसी येथील महामार्ग पोलिसांची चौकीच उठवण्यात आली आहे. भोकरफाटा व बारड या दोन जागांमधील अंतर केवळ १० किलोमीटर आहे. महामार्ग पोलिसांची रात्रीची गस्तही कागदोपत्री चालते, असे सांगण्यात आले. महामार्ग पोलिसांवर जिल्हा पोलीस दलाचे कोणतेही थेट नियंत्रण नाही. येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालही महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक लिहितात. नांदेड, तसेच मराठवाडय़ातील बहुतांश जिल्हे नागपूर महामार्ग पोलिसांच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे येथील अनागोंदीला कोण व कशा प्रकारे लगाम घालील, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.