आकाशकंदिल, फटाक्यांसह तयार फराळाच्या खरेदीची धूमं Print

परभणी / वार्ताहर - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
दिवाळीनिमित्त बाजारात सर्वत्र खरेदीची धूम आहे. फटाक्यांसह आकर्षक आकाशकंदिलांची लोक चोखंदळपणे निवड करताना दिसत आहेत. दुसरीकडे फराळाचे साहित्य घेण्याऐवजी थेट फराळाचे पदार्थच विकत घेण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीआधी घरोघरी फराळ तयार करण्याच्या कामी नेहमी दिसून येणारी लगबग आता कमी झाल्याचे दिसते.
कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी दिवाळी सणानिमित्त करण्यात येते. या वर्षी बाजारात फ्रीज, डीव्हीडी, टीव्ही, संगणकाची खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली. कपडय़ांच्या बाजारातही मोठी झुंबड असून यातही मोठी उलाढाल होत आहे. किराणा बाजारातही तेजी असून दिवाळीनिमित्त ग्राहकांची गेल्या आठ दिवसांपासून किराणा माल घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
शहरात सिटी क्लब मैदान व गंगाखेड रस्त्यावर दोन ठिकाणी फटाक्यांची दुकाने लागत आहेत. या वर्षी फटाक्यांमध्ये मनोज, विनायका, स्टँडर्ड, लक्ष्मी, सूर्यकला, लियो आदी कंपन्यांचे फटाके दाखल झाले आहेत.
स्टँडर्ड व फॅन्सी फटाक्यांना जास्त मागणी आहे. सध्या सर्व प्रकारच्या मिठाया बाजारात उपलब्ध आहेत. बाजारपेठेमध्ये धाग्यांचे वापर केलेले आकाशकंदिल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध प्रकारचे आकाशदिवे विक्रीसाठी बाजारपेठेत आले आहेत. या आकाशदिव्यांना चांगली मागणी असून चांदणी, पॅराशूट आकाराचे आकाशकंदिल विक्रीसाठी आले आहेत.
आकाशदिव्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. विविध रंग व आकारातील राजस्थानी, चायनामेड, कापड, कागद व प्लास्टिक पेपरपासून बनवलेले हे आकाशदिवे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. साधारण ४० ते २०० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. व्यापाऱ्यांसाठी खातेवह्य़ा, विविध तोरणे, साबण, सुगंधी तेल, सुगंधी उटण्यांचे विविध प्रकारदेखील उपलब्ध आहेत. आकार, रंग, कलात्मकता व कलाकुसरीनुसार त्यांच्या किमती आहेत. साधारणत: ३० ते ६० रुपये डझन पणत्यांच्या किमती असून दीपमाळ, लामण दिव्यांच्या किमती १५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. माती, चिनी माती, सिरॅमिक, काचेच्या पणत्यांचे विविध ४०हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. ४० ते १५० रुपये भाव आहे.