लातूरमध्ये पेरणीची जुळणी सुरू; ठिकठिकाणी पाऊस Print

लातूर, १२ जून/वार्ताहर

मृग नक्षत्रात सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे आज बाजारपेठेत पेरणीची जांगजोड करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू होती. जिल्हाभर काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे आता पेरणीची जांगजोड करण्याशिवाय पर्याय नाही ही खूणगाठ शेतकऱ्यांनी सकाळीच मनाशी बांधली व बाजारचा रस्ता धरला.

बी-बियाणे, खते खरेदीचा त्रास असतानाच इकनफाटा ठीकठाक करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. चाडे, नळे, तिफणीचे इडे, कुळवाच्या फासा याची तयारी सुरू होती.
बाजारात गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकचे नळे व चाडे उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे. कुळवाच्या फासासाठी मात्र अद्यापि पर्याय नाही, त्यामुळे गावोगावी सुताराच्या मागे लागून फासा शेवटण्याचे काम सुरू होते.
आज दुपारनंतर वरुणराजा पुन्हा प्रसन्न झाला व सुमारे तासभर तो बरसला. हे बरसणे सर्वदूर होते. बरसण्याच्या सुरुवातीपासूनच त्याने आज शेतकऱ्याचे मन शांत करायचे हे ठरवून बरसण्यास सुरुवात केली असे दिसून येत होते. संपूर्ण जिल्हाभर या पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा नसला तरी ‘तू पेरणीची तयारी कर, मी येतो आहे’ असे आश्वासन मात्र त्याने दिले. त्यामुळे भर पावसातही बाजारपेठेतील गर्दी हटत नव्हती. डोक्यावर पटकूर बांधून मिळेल त्या वाहनाने गावाकडे जाण्याची तयारी लोक करीत होते. कालच्या पावसाने घरावरील पत्रे उडून, शेतातील झाडे मोडून पडली; त्यामुळे काहीसा हवालदिल झालेला शेतकरी आजच्या पावसाने आनंदला.

बीडमध्ये पावसाचे आगमन
बीड/वार्ताहर -
मृगाच्या पहिल्या पावसाचे काल रात्री तुरळक हजेरी लावली आणि आज सायंकाळी त्याने दमदार दर्शन दिले. पावसाच्या आगमनामुळे वाढलेल्या उकाडय़ातून सुटका झाली. पहिल्याच पावसात वीज पडून गेवराई तालुक्यात दोन जण मृत्युमुखी पडले.
जिल्ह्य़ातील केज, धारूर, परळी, अंबाजोगाईसह काही भागांत मृगाच्या पावसाच्या हलक्या सरी काल सायंकाळी पडल्या. सायंकाळी ७ वाजल्यानंतर काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. आज दिवसभर प्रचंड उकाडा वाढला आणि सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जिल्ह्य़ात सर्वदूर पावसाच्या सरी बरसल्या. जवळपास पाऊण तास पाऊस झाल्यामुळे चार महिन्यांतील प्रचंड उकाडय़ापासून सुटका झाली.
पहिल्या पावसाचा लहान मुलांनी चांगलाच आनंद घेतला. मृगात पावसाची चांगली सुरुवात झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीची धावपळ सुरू होणार आहे, पण आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
वीज पडून दोघांचा मृत्यू
गेवराई तालुक्यातील पिंपळगाव अनडी येथे काल सायंकाळी वीज पडून रेखा मुरलीधर वराट (वय १९) मृत्युमुखी पडली. पाचेगाव येथेही वीज पडून शेतकरी शंकर जाधव (वय ५०) मृत्युमुखी पडले.

लोह्य़ात जोरदार पाऊस
लोहा/वार्ताहर -
शहर व परिसरात आज सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्याच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला.
पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला. या वर्षी मृगाच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आज सायंकाळी साडेचार वाजता मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचले. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सकाळी वातावरणात उकाडा होता. दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले. जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला. आणखी दोन-चार असेच पाऊस पडले तर मृगातच खरिपाच्या पेरण्या होतील, असे सध्याचे चित्र आहे.

मेघगर्जनेसह पाऊस
परतूर/वार्ताहर -
शहर परिसरात आज साडेचार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. कापूस लागवड व खरिपाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणारा असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कालही तसेच वातावरण होते. जोरदार पाऊस कोसळेल असे वाटत असताना त्याने हुलकावणी दिली. आज कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचार वाजता जोरदार पावसाला प्रारंभ झाला. सोबतच जोरदार वारेही वाहू लागले. अध्र्या तासानंतर पाऊस थांबला. पेरणीच्या तयारीतील शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मृगातील पाऊस कोसळल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात घट झाली आहे. यंदा कधी नव्हे एवढी तापमानात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच पाणीटंचाईची झळ बसत होती.

दोन जनावरे दगावली
 वसमत/वार्ताहर -
तालुक्यातील आरळ येथे काल रात्री बाबूराव राऊत यांच्या गुराच्या गोठय़ावर वीज पडून एक गाय व एक म्हैस दगावली. त्यामुळे त्यांचे सुमारे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. वसमत, आरळ, जवळा, औंढा नागनाथ, हिंगोलीसह काही गावांमध्ये पावसाच्या सरी पडल्या. सायंकाळी आकाशामध्ये पावसाळी ढग जमलेले होते.