‘म. गांधी निसर्गोपचार व स्वदेशी महामंत्राचे उद्गात’ Print

भंडारा / वार्ताहर
गांधीजयंती आणि प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारत स्वाभिमान न्यासाचे अध्यक्ष रामविलास सारडा आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. धनलाल शेंदरे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले. तत्पूर्वी, दिनाचे औचित्य साधून विदेशी कंपन्यांना विरोध, स्वदेशी, महागाई, भ्रष्टाचार, एफ.डी.आय.विरोध, प्राकृतिक चिकित्सा, काळा पैसा यासंबंधी नारे देत शहरातून रॅली काढण्यात आली. गांधी पुतळ्यासमोर भ्रष्टाचार, महागाई, एफ.डी.आय.विरोधात लिहिलेली प्रतीकात्मक पत्रके जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना स्वदेशी काळाची गरज, असे सांगत रामविलास सारडा म्हणाले, म. गांधी स्वदेशी व निसर्गोपचार या महामंत्राचे उद्गाते होते. त्यांनी खादी-स्वदेशी या माध्यमातून इंग्लंडमधील वस्त्रोद्योग व अन्य उद्योगांना आव्हान दिले. निसर्गोपचारावर बोलताना प्रमुख अतिथी डॉ. धनलाल शेंदरे यांनी देशातील वाढते अनारोग्याबद्दल चिंता व्यक्त करीत निसर्गोपचार या मूलभूत चिकित्सा प्रकाराची माहिती दिली. आरोग्यचिकित्सेबद्दल परकीयांची गुलामगिरी म. गांधींना अमान्य होती. मिट्टी, पाणी, धूप, हवा, सब रोगों की एक दवा या सूत्राला म. गांधींनी रामनाम हे पाचवे सूत्र जोडले होते, असे सांगत श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी निसर्गोपचार प्रणालीवर चर्चा घडवून आणली. याप्रसंगी आभार पतंजली योग समितीच्या अध्यक्ष संध्या बांते यांनी मानले.