खामगाव अर्बन बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचे आज उद्घाटन Print

बुलढाणा / प्रतिनिधी
मल्टी स्टेट शेडय़ुल्ड बँक दि खामगाव अर्बन को-ऑप. बँकेचे उद्या ४ ऑक्टोबरला सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण होत असून त्यानिमित्त उद्घाटन सोहळा खामगावातील श्री कोल्हटकर स्मारक मंदिरात दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
 खामगाव अर्बन बँकेच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन पुणे येथील चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेचे नागरी बँक विभाग प्रमुख एस. त्यागराजन, पुणे येथील जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंदराव खळद्रर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल पारिक राहतील. खामगाव येथे ४ ऑक्टोबर १९६३ रोजी बँकेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक वसंतराव कसबेकर यांच्या प्रेरणेतून झाली. फक्त समाजासाठीच काम करणाऱ्या माणसांच्या सामर्थ्यांवर ही बँक वाढली. बँकेच्या बुलढाणा जिल्ह्य़ात १२ शाखा, अमरावती जिल्ह्य़ात १४ शाखा तसेच जळगाव जिल्हा २, औरंगाबाद, अकोला, नागपूर व मध्य प्रदेशात बुरहानपूर येथे एक अशा एकूण ३२ शाखा तसेच २ विस्तार कक्ष असून बँकेचे मुख्य कार्यालय खामगाव येथे आहे.  बँकेला २२ मे १९९९ रोजी शेडय़ुल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाला.