अतिक्रमित नागरिकांना घराचे कायमस्वरूपी भाडेपट्टे Print

माजी राज्यमंत्री सावजी यांचा नागरी सत्कार
बुलढाणा/ प्रतिनिधी
मेहकर शहरातील अतिक्रमित नागरिकांना कायमस्वरूपी घराचे भाडेपट्टे मिळवून देणाऱ्या माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा नुकताच नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे. गेल्या तीस वर्षांपासून शहराच्या विविध भागांत अनेक नागरिक कच्ची व पक्की घरे बांधून राहत होते, परंतु या अतिक्रमित नागरिकांच्या घरांचा मालकी हक्क शासनाकडे होता. त्यामुळे या नागरिकांना शासनाच्या विविध सोईसवलतींपासून वंचित राहावे लागत होते. अतिक्रमित नागरिकांना कायमस्वरूपी भाडेपट्टी देण्यात यावी, यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून भाडेपट्टय़ाचे आदेश काढले. त्यामुळे या भागातील रहिवाशांना त्यांच्या घराचा मालकी हक्क प्राप्त झाला. त्यामुळे झोपडपट्टी निवासी नागरी समितीच्या वतीने मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानावर त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी व विठ्ठल ढाकरके या दोघांचा नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, ढाकरके यांच्या घरापासून ते शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा परिषदेच्या सभापती सायली सावजी, शैलेश सावजी, फिरोज पठाण यांच्यासह शहरातील मिलिंद नगर, साठे नगर यासह इतर अतिक्रमित नगरांतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी सावजी यांनी मेहकर मतदार संघात १९७८ पासून समाजकारणासोबतच राजकारण करीत असल्याचे सांगितले. या कार्यकाळात आपण अनेक विकासकामे केली आहेत. शहरातील अतिक्रमित नागरिकांना कायमस्वरूपी जागेचे भाडेपट्टे देण्यात यावे, या मागणीचा पाठपुरावा करून तसा आदेशही काढला. हा माझा विजय नसून तो सर्व नागरिकांचा आहे. शहरातील ब्रिटिश काळातील सर्व शासकीय इमारती व निवासस्थाने नगर परिषदेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी व्यापारी संकूल बांधावे, जेणेकरून व्यवसायाला चालना मिळेल. तसेच कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही शहराबाहेर बांधण्यात यावी, अशी मागणी पाटील यांच्याकडे केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन उद्धव बाजड यांनी, तर आभार बबन मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला संजय ढाकरके, अरविंद घुगे, डिगांबर गवई, विलास मोरे, संध्या रनाईत, सुमन काकडे, लीला कटारे, विजय बनचरे, रामदास मोरे, संतोष सदावर्ते, अनिल गीते, डिगांबर मानवतकर, नंदू सावजी, किशोर आराख, गजानन तांगडे, विनोद जाधव, शेख महेबुब, दशरथ पाटोळे, निवृत्ती गवई, दिलीप साळवे, वसंत माने, लक्ष्मण गायकवाड, अयुब कुरेशी यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.