नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात प्राणिसंग्रहालय देण्याची नागरिकांची मागणी Print

गोंदिया/ वार्ताहर
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकेकाळी पर्यावरणासाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील प्राणिसंग्रहालय (मृगविहार) बंद झाल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. राष्ट्रीय आकर्षण असलेले हे प्राणिसंग्रहालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
राष्ट्रीय उद्यानाच्या निर्मितीनंतर पर्यटकांच्या दृष्टीने कॉम्प्लेक्स परिसरात विविध उद्याने, आकर्षक विश्रामगृहे, बालोद्यान व मृगविहारांची निर्मिती करण्यात आली होती; परंतु अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे राष्ट्रीय उद्यानाच्या या कॉम्पलेक्स परिसरातील ही स्थळे ओस पडू लागली. येथील प्राणिसंग्रहालयात हरीण, सबेरियन पक्षी, नीलगाय, काळवीट, अस्वल, मोर, वानर, ससे, बिबटे, अजगर आदी प्राणी असल्याने येथे नेहमी पर्यटकांची गर्दी होत होती; परंतु केंद्रीय प्राणी प्राधिकरण विभाग दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी या प्राणिसंग्रहालयास भेट देऊन हे प्राणिसंग्रहालय बंद करण्याची शिफारस केंद्र शासनास केली व त्या आधारे हे संग्रहालय बंद करण्यात आले. प्रशस्त िपजरे, मोकळी पहाडी क्षेत्राची जागा, उत्तम कुंपणाने युक्त असलेले हे प्राणिसंग्रहालय का बंद करण्यात आले हे कळायला मार्ग नाही.
परंतु तत्कालीन सत्तेवर असतानाही या भागाचे आमदार दयाराम कापगते व खासदार नामदेवराव दिवटे यांनी हे प्राणिसंग्रहालय बंद होत असताना ते बंद होऊ नये यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत वा तशी गरजही त्यांना त्या वेळी भासली नाही. त्यामुळे कॉम्प्लेक्स परिसरातील एक उत्तम पर्यटनकेंद्र प्राणिसंग्रहालय बंद पडले. ते पूर्ववत सुरू करण्यासाठी सध्याचे या क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न करावे व पर्यटकांना सुखद दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. राष्ट्रीय उद्यान कॉम्पलेक्स परिसरात लॉग हट, संजय कुटी तसेच हॉली-डे होम अशी अनेक विश्रामगृहे बनविण्यात आलेली आहेत. यांच्या देखरेखीवर शासनाचे लाखो रुपये खर्च होतात; परंतु येथील विश्रामगृहांचे आरक्षण केवळ दोन सूट वगळता गोंदिया येथील उपवनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयातून होत असते. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना जर वेळीच थांबावयाचे असल्यास त्याला नवेगाव येथील अधिकाऱ्यांकडून आरक्षण मिळत नाही.
एकेकाळी याच कॉम्प्लेक्स परिसरात दृष्ट लागावी असे मनोहर उद्यान, हिलटॉप गार्डन, हॉली डे होम्स गार्डन, लॉग हटजवळील गार्डन असे एकाहून एक अशी सरस बगिचे होते जे पर्यटकांची मने मोहून घेत असत; परंतु हळूहळू या बगिचाकडे दुर्लक्ष झाले. आकर्षक फुलझाडे व इतर झाडांनी व वेलींनी नटलेले हे बगिचे ओसाड झाले. काही बगिचे तर केवळ कागदावरच शिल्लक राहिले व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेले हे बगिचे काळाच्या पडद्याआड झाले; परंतु या क्षेत्राचे तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला पुन्हा पर्यटनकेंद्र बनविण्याचा संकल्प केला होता. तेव्हा यामधीलच एक तरी बगिचा पूर्वीसारखा बहरेल या दृष्टीने बाग पुनर्निर्मिती करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींकडून होत आहे. सध्या वन्यजीव विभाग उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे असून तेथून नागझिरा अभयारण्य व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा कारभार चालतो. या उपवनसंरक्षणाच्या कार्यालयावर लाखो रुपयांचा खर्च महिन्याकाठी होतो.
वास्तविक नवेगावबांध येथे वनविभाग कार्यालय व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. जर गोंदिया येथील उपवनसंरक्षकाचे कार्यालय नवेगावबांध येथे हलविण्यात येऊन स्थानिक राष्ट्रीय उद्यान तसेच ३० किमी. अंतरावरील नागझिरा अभ्यारण्यावर या अधिकाऱ्यांचे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. ज्यामुळे प्रशासनात गतिमानता निर्माण होईल. या दृष्टीने गोंदिया येथील उपवनसंरक्षकाचे (वन्यजीव) कार्यालय नवेगावबांध येथे हलविण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत लोकप्रतिनिधी या कामी लक्ष घालत नाही तोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागू शकणार नाहीत हेही तेवढेच खरे आहे.