आमगाव तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद Print

नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ
गोंदिया / वार्ताहर
आमगाव तालुक्यातील ४८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील १९ गावांचा पाणीपुरवठा १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आला आहे. पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता यांनी अलीकडेच दिले आहेत.  
 पाणीपुरवठा योजना बंद करण्यामागील कारण देताना पाणी टंचाईचा कालावधी संपला असल्याचे सांगण्यात आले आहे. आमगाव तालुक्यातील ज्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे त्यात घाटटेमनी, बोदा, गिरोला, मोहगाव, मुंडीपार, बंजारीटोला, नंगपुरा, मरारटोला, ननसरी, सरकाटोला, धामगाव, भजेपार, किकरीपार, जामखारी, आसोली, फुक्कीमेटा, वळद, तिगाव, पानगाव आदींचा समावेश आहे. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आमगाव तालुक्यातील ४८ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, मात्र आता १९ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याने या गावातील नागरिकांना दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे एक प्रकारे आजारांना निमंत्रण दिल्यासारखाच प्रकार प्रशासनाच्या भूमिकेमुळे ओढवला आहे. विशेष म्हणजे, ज्या गावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यातील जवळपास अध्र्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू असून देखील उन्हं चांगलेच तापत असताना पाणीपुरवठा बंद केल्याने या १९ गावातील जवळपास हजारावर नागरिकांवर संकट ओढवले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणीपुरवठा योजना बंद करण्याचे आदेश त्वरित मागे घेऊन
पूर्ववत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा कृती समितीचे संयोजक जगदीश शर्मा, बनगावचे सरपंच राजकुमार फुंडे, विश्वनाथ मानकर, ज्योती खोटेले व रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे.