वाशीम जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू Print

वाशीम / वार्ताहर
मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथे आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे वीज पडून दोन जण ठार झाल्याची घटना घडली मंगळवारी दुपारी ३.३० वाजतापासून जिल्ह्यातील वाशीम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सध्या जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असून मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथे सुखदेव श्यामराव मानकर (४०) त्यांच्या शेतात सोयाबीन कापणीचे काम सुरू असताना ते शेतामध्ये बसलेले होते. अचानक मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुखदेव मानकर यांचेकडे तीन एकर शेती असून ते नाशिक येथे रोजगारासाठी दरवर्षी जात होते. सध्या त्यांच्या शेतात सोयाबीन कापणीचे काम सुरू असल्यामुळे ते नाशिकवरून घरी परत आले होते. अचानक ही घटना घडल्याने मानकर परिवारासह भूर येथील ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता दरम्यान शेतात सोयाबीन कापणीचे काम करीत असताना गोदावरी वामनराव मिटकरी (५०) या महिलेच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना वाशीम येथील सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंगळवारी जिल्ह्यात एकूण १०९ मि.मी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ४२ मि.मी, वाशीममध्ये ३५.८ मि.मी., मानोरा १५.६ मि.मी., मालेगाव १३.६ मि.मी., मंगरूळपीर २ मि.मी. एवढा पाऊस झाला. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान विविध भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.