चंद्रपूर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस, शाळांना सुटी Print

चंद्रपूर / प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
जिल्ह्य़ात आज सकाळी सर्वदूर परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. म.गांधी व कस्तुरबा या मुख्य मार्गासह शहरातील बहुसंख्य भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकून पडली होती.
यावर्षी जिल्हय़ात चांगला पाऊस पडला. जुलै महिन्यात जेथे सरासरी पेक्षा थोडा कमी पाऊस झाला तेथे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतांनाच पावसाळा संपत आहे म्हणतांना काल सायंकाळी व आज सकाळी जिल्ह्य़ात सर्वदूर परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज पहाटे पाच वाजतापासून तर अकरा वाजेपर्यंत सततधार पाऊस सुरू होता. या पावसाचा वेग इतका होता की, अवघ्या काही मिनिटात शहरातील महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, जयंत टॉकीज, गिरनार चौक, गांधी चौकात सर्वदूर पाणीच पाणी साचले होते.
पावसाच्या पाण्यात सकाळी शाळेला जाणारी वाहने अडकून पडली होती. मुसळधार पाऊस बघता शहरातील बहुसंख्य शाळांनी आज सुटी दिली. शहराच्या मध्यभागी असलेल्या गोल बाजारात सर्वदूर पावसाचे पाणी साचले होते, तर शहरातील प्रमुख नाल्याही तुडूंब भरून वाहत होत्या. केवळ शहरातच नाही तर लगतच्या बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, राजुरा व कोरपना या तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील खोलगत वस्त्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले. सिस्टर कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, रहमतनगर, महसूल कॉलनी या भागात सकाळी गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी होते, मात्र अकरा वाजता पाऊस थांबल्यानंतर पाऊस निघून गेला. पाऊस थांबला असला तरी आकाशात ढगांनी गर्दी केलेली असल्याने रात्री उशिरा केव्हातरी पाऊस पडण्याची शक्यता आहे.