संक्षिप्त Print

‘सृजन’चा ‘चांदे अँड चांदे इन चांदे’ रंगला
चंद्रपूर :  सृजनचा सप्टेंबर महिन्याचा कार्यक्रम चांदे अँड चांदे इन चांदे, उल्लेखनीय अशा उपस्थितीत उत्साहात पार पडला. चांदेकरांनी आम्हा उभयतांना भरभरून प्रेम दिले. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्यच नाही, असे सांगत राम चांदे व कीर्ती चांदे यांनी सामाजिक सहप्रवास उलगडून दाखविला. जीवन ही एक दैवी देणगी आहे आणि ही धरती एक कर्मभूमी आहे. आपल्या सगळय़ांना अथक कर्म करायचे आहे. निग्रह आणि समर्पण या दोन गोष्टी जवळ असतील तर कोणतेही शिखर सर केले जाऊ शकते, अशी सैद्धांतिक मांडणी असणाऱ्या चांदे दाम्पत्याने या वेळी उपस्थितांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत कुळकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राधिका ठेंगणे हिने केले.
गावस्तरावर स्वच्छता निर्माण करा -शिंदे
गावस्तरावर कायमस्वरूपी स्वच्छता निर्माण करावी, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी केले. स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी विजय वाघमारे, मनुष्यबळ विकासतज्ज्ञ संजय धोटे, अंकुश केदार, विवेक बोंद्रे, संतोष गव्हाणकर, उपजिल्हाधिकारी नान्हे, कृष्णकांत खानझोडे, मनोज डांगरे, नरेंद्र रामटेके, अनिरुद्ध वाळके उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी वाघमारे यांनी शिवारफेरीला मिळत असलेले यश हे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सांघिकरीत्या यश असून सर्व अभिनंदनास पात्र आहे, असे त्यांनी सांगितले. मनुष्यबळ विकासतज्ज्ञ संजय धोटे यांनी जिल्ह्य़ात करावयाच्या पायाभूत सर्वेक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अर्चना काशिकर यांनी, तर आभार राजेश माथनकर यांनी मानले. कार्यशाळेसाठी निर्मल भारत अभियान कक्षातील सर्व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने म. गांधी जयंती
शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती जिल्हा काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया व शहर अध्यक्ष गजानन गावंडे उपस्थित होते. सर्वप्रथम नरेश पुगलिया व गजानन गावंडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वानी पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, अरुण बुरडकर, बाबुलाल करुणाकर, सुधाकरसिंह गौर, शंकर झाडे, श्यामकांत थेरे, अनिल तुंगीडवार, तेजरात भगत व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात अहिंसा रॅली
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त जागतिक अहिंसा दिन रॅली काढण्यात आली. ही रॅली जटपुरा गेटपर्यंत पोहोचल्यावर किल्ल्याअंतर्गत असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उपप्राचार्य संजय बेले यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर जटपुरा गेट मार्गाने ही रॅली महाविद्यालयात परत आली. यानंतर महात्मा गांधींच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य स्निग्धा सदाफळे यांनी माल्यार्पण केले. या रॅलीचे नेतृत्व प्रा. डॉ. विजया गेडाम, प्रा. दिलीप रामटेके, राहुल मानकर, प्रांजली बोबडे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजया गेडाम यांनी, तर आभार प्रा. विना गजभे यांनी मानले.
एफईएस गर्ल्स कॉलेजमध्ये शांतीयात्रा
 एफईएस गर्ल्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधी व दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शांतीयात्रेचे आयोजन करण्यात आले. या शांतीयात्रेचे नेतृत्व अ‍ॅड. विजय मोगरे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते व प्राचार्य प्रभू चोथवे यांनी केले. महाविद्यालयातून निघालेली ही शांतीयात्रा गिरनार चौक, गांधी चौक ते जटपुरा गेटपासून कस्तुरबा मार्गे महाविद्यालयात परत आली. जटपुरा गेट येथील महात्मा गांधींच्या पुतळय़ाला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या शांतीयात्रेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या शांतीयात्रेचे संयोजन प्रा. डॉ. इसादास भडके यांनी प्राचार्य प्रभू चोथवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
 जिल्हा अध्यक्षपदी सचिन दातार
 रिपब्लिकन विद्यार्थी संसदचा चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सचिन दातार यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत रिपाइंचे प्रमुख पदाधिकारी शहर अध्यक्ष अशोक पांचाळे, जिल्हा सचिव राजू भगत, महासचिव सिद्धार्थ पाथाडे, तालुका अध्यक्ष हंसराज वनकर, जिल्हा युवक आघाडी महासचिव किशोर ढवळे यांनी नियुक्ती केली. सचिन दातार यांच्या नियुक्तीबद्दल बाळू जाधव, विनोद भिमटे, राहुल इंगोले, आशीष रामटेके, सुजीत सरकार, संदीप जाधव, अमन कुडवे आदींनी अभिनंदन केले.