नामदेव सडमेक यांच्यावर अहेरी येथे अन्त्यसंस्कार Print

गडचिरोली / वार्ताहर
गांधी जयंती दिनी येथील जिल्हा परिषदेसमोर विषप्राशन करून आत्महत्या केलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक नामदेव ऊर्फ बंडू सडमेक यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अहेरी येथील स्मशानभूमीवर अन्त्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती.  जिल्हा परिषद प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे सेवानिवृत्तीचे प्रकरण तसेच पेन्शन मार्गी न लागल्याने कंटाळून नामदेव ऊर्फ बंडू सडमेक यांनी मंगळवारी सकाळी विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्यांच्या नातेवाईकांनी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सडमेक यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर ही भूमिका बदलून पत्रकार परिषद घेतल्यानंतर सडमेक यांचे पार्थिव रात्री अहेरी येथे त्यांच्या गावी नेण्यात आले.   बुधवारी दुपारी त्यांच्या घरून अंत्ययात्रा निघाली. गावातील प्रमुख मार्गाने फिरून स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यांची एक वर्षांची मुलगी धनेंद्रीदेवी हिने मुखाग्नी दिला. या वेळी आयोजित शोकसभेत नागविदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव महाराज, रवींद्रबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बबलू हकीम, ॠतुराज हलगेकर, रवींद्र वासेकर, जिल्हा परिषद सदस्य नंदा दुर्गे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.