इतिहासाचा साक्षीदार गाविलगड ढासळतोय Print

* पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
* गुप्तधन शोधणाऱ्यांमुळे संकट

मोहन अटाळकर, अमरावती, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
सुमारे हजार वर्षांचा ज्ञात इतिहास असलेला मेळघाटातील गाविलगड किल्ला पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आला असून किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड अजूनही सुरूच आहे. गुप्तधनाच्या शोधासाठी जागोजागी खोदकाम केले जात असल्याने या किल्ल्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
गावीलगड अनेक वष्रे वऱ्हाडची राजधानी होता. बहामनी, इमादशाही, निजामशाही, मोगल आणि मराठे यांची सत्ता या किल्ल्याने अनुभवली. अभेद्य असा हा किल्ला अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार ठरला आहे. शत्रूंच्या हाती लागू नये म्हणून शूर स्त्रियांनी केलेला जोहार, इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याची व्यूहनीती गावीलगडाने पाहिली. १८०३ चे मराठय़ांविरोधातील युध्द इंग्रजांनी वेलस्लीच्या नेतृत्वात गाविलगडावर लढले. स्थापत्यकलेच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व वेगळेच. भव्य, सुंदर दरवाजे, मजबूत इमारती, तलाव, तोफांची ओळ, प्रार्थनास्थळे हे किल्ल्याचे वैभव होते. १८५७ मध्ये तात्या टोपे यांना बंडादरम्यान या किल्ल्याचा वापर करण्यास वाव मिळू नये म्हणून या किल्ल्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी करुन पाहिला, त्यानंतर हा किल्ला दुर्लक्षित राहिला. आज हा किल्ला भग्नावस्थेत आला आहे.
पर्यटकांसाठी अनमोल ठेवा असलेल्या या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने हा किल्ला ढासळत चालला आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना अलीकडच्या काळात झालेल्या नाहीत.
इतिहासकार फरिस्ता यांच्या नोंदीनुसार बहामनी राजा बादशाह अहमदशाह वली याने १४२५-१४२६ दरम्यान हा किल्ला बनवला. त्याआधी या ठिकाणी अहिर नावाच्या गवळी राजाने याच ठिकाणाहून सत्ता सांभाळली, त्यामुळे या किल्ल्याला गवळीगड म्हटले जाऊ लागले आणि नंतर अपभ्रंश होऊन त्याचे गाविलगड झाले. १५ व्या शतकात हा बहामनी राज्याचा एक भाग होता. पुढे अहमदनगरच्या राजाने हा किल्ला जिंकून घेतला. बऱ्हाणपूरचा राजा महमदशाह फरुकी याने किल्ल्यावर हल्ला केला पण अहमदनगरच्या राजाने तो यशस्वी होऊ दिला नाही. नंतर हा किल्ला अकबराच्या अधिपत्याखाली आला. मग काही काळ तो निजामाकडे होता. त्यानंतर १६३६ ते १६८० या काळात तो मोगलांच्या ताब्यात होता. १८०३ मध्ये ब्रिटिश सेनापती जनरल वेलस्ली याने किल्ल्यावर हल्ला चढवला. अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची साक्ष असलेला हा किल्ला भव्य आहे. पण, किल्ल्याची राखण करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याने किल्ल्यात गुप्तधन शोधण्यासाठी जागोजागी खड्डे खणले जात आहे, त्यामुळे अनेक भागात मोठय़ा प्रमाणावर पडझड सुरू झाली आहे.
गाविलगड किल्ल्यावर पूर्वी मोठय़ा दहा ते बारा तोफा असाव्यात. त्यापैकी सहा तोफा अजूनही किल्ल्यावर आहेत. तटबंदीच्या आत पाच तलाव आहेत. या किल्ल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावांपैकी तीन तलावांमध्ये पाणी साठलेले दिसते, पण ते पिण्यायोग्य नाही. बुरूज आणि दरवाजे आजही या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत असले तरी एकेक भाग ढासळत चालला आहे.
या किल्ल्यात बारुदखाना, राणी महाल, राणी झरोखा, तेलखाना, धान्यखाना, जनानखाना, हत्तीखाना, जामा मशीद या इमारती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. या इमारतींची वेळीच डागडुजी न केल्यास त्यांच्या अस्तित्वाला देखील धोका पोहचू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.