अमरावती विभागातून किमान चार रेल्वे गाडय़ा सुरू करा -खा. अडसूळ Print

अंदाजपत्रकातील घोषणा अद्याप कागदावरच
 अमरावती / प्रतिनिधी
रेल्वे अंदाजपत्रक सादर करताना अमरावती विभागातून अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची घोषणा होऊनही अद्याप या रेल्वेगाडय़ा सुरू न करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत. या रेल्वेगाडय़ा लवकरात लवकर सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.एन. अस्थाना यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
रेल्वेच्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेमंत्र्यांनी अमरावती-नरखेड रेल्वेमार्गावरून नव्या गाडय़ा सुरू केल्या जातील, अशी घोषणा केली होती, पण अद्यापही या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही, याकडे खासदार अडसूळ यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले आहे. या गाडय़ा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने त्या अनुषंगाने अडसूळ यांनी हे पत्र पाठवले आहे. शिवाय, अमरावती-पुणे ही लातूर, कुर्डूवाडीमार्गे जाणारी एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, पण ही गाडी अजूनही सुरू झालेली नाही. हैदराबाद-अजमेर ही गाडी अकोला-अमरावती-नरखेड-इटारसी मार्गे वळवण्यात यावी. सध्या ही गाडी अकोला-खंडवा मार्गे धावत आहे. अमरावती विभागातील अनेक जिल्ह्य़ातील प्रवाशांना अजमेर किंवा हैदराबादला जाण्यासाठी ही गाडी सोयीची ठरणार आहे, असेही अडसूळ यांनी पत्रात म्हटले आहे. दिवाळीपूर्वी या गाडय़ा सुरू झाल्यास प्रवाशांना या नव्या गाडय़ांचा लाभ घेता येईल. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने अमरावती विभागाकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रवाशांची भावना झाली आहे. त्यामुळे या गाडय़ा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी आनंदराव अडसूळ यांनी केली आहे.