अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दंडित करणाऱ्या प्राचार्याची तडकाफडकी बदली Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
परीक्षा फार्म विद्यापीठात उशिराने सादर करून प्रती विद्यार्थी पाचशे रुपये विलंब शुल्क वसूल करणारे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य पी.एस. अडवानी यांची औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, या महाविद्यालयाला कार्यक्षम नियमित प्राचार्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
 बल्लारपूर-चंद्रपूर बायपासवर असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले एक ते दीड हजार विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, मात्र प्राचार्य पी.एस.अडवाणी यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे हजारो विद्यार्थ्यांना यावर्षी नाहक भरुदड सहन करावा लागला. नागपूर विद्यापीठाने परीक्षा फार्म निर्धारित कालावधीत विद्यापीठाकडे सादर करण्यास महाविद्यालय व्यवस्थापनाला सांगितले होते, परंतु प्राचार्य अडवाणी यांच्या चुकीमुळे ते विलंबाने सादर करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयाला दंडित केले होते. हा दंड प्राचार्य अडवाणी यांनी प्रती विद्यार्थी पाचशे रुपये याप्रमाणे गोळा केला. कुठलीही चूक नसतांना प्राचार्य विद्यार्थ्यांना दंडित करत असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध केला, मात्र प्राचार्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दंड भरा अन्यथा परीक्षेपासून वंचित राहा, असे फर्मान प्राचार्यानी सोडले. त्यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी मनसे नेते राजेंद्र अल्लेवार यांच्याकडे बाजू मांडली. विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन अल्लेवार यांनी मनसे कार्यकर्त्यांसह महाविद्यालयात आंदोलन केले, तर माध्यमांनीही विद्यार्थ्यांचे हे प्रकरण लावून धरले.  मात्र, या आंदोलनानंतरही प्राचार्य काही ऐकायला तयार नव्हते. यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची दखल घेऊन प्राचार्य अडवाणी यांची औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली. विद्यार्थ्यांना दंडित करणाऱ्या प्राचार्यानाच उच्च तंत्रशिक्षण खात्याने बदली करून दंडित केले आहे. प्राचार्याच्या बदलीचे आदेश येथे येऊन धडकताच विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, राज्याच्या शेवटच्या कोपऱ्यावर असलेल्या या जिल्ह्य़ातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला नियमित प्राचार्य देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. या महाविद्यालयात बऱ्याच समस्या असून नियमित प्राध्यापक व कर्मचारीही नाहीत. प्राध्यापक व कर्मचारी यांची भरती करावी, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.