जिल्हा रुग्णालयातील बालरुग्णांची खाजगीरीत्या नियमबाह्य़ रक्त तपासणी Print

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उग्र आंदोलन
 बुलढाणा / प्रतिनिधी
शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिअद्ययावत पॅथॉलॉजी लॅब असतानासुद्धा तेथील बालरोगतज्ज्ञाने बालरुग्ण कक्षातील लहानग्या रुग्णाचे रक्त नियमबाह्य़रीत्या एका खाजगी पॅथॉलॉजीला पाठवून रुग्णांची लूट करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि लखनभाऊ गाडेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित बालरोग तज्ज्ञाविरुद्ध उग्र आंदोलन केले. या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधितांवर प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत.  जिल्हा रुग्णालयाच्या बालरुग्ण कक्षातील अनेक लहानग्या रुग्णांचे रक्त या विभागाचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कोठारी यांनी येथील एका खाजगी पॅथॉलॉजीला पाठविले. त्याबदल्यात त्यांनी रुग्णांकडून मोठय़ा प्रमाणावर नियमबाह्य़ रकमा उकळल्या. वास्तविकत: नियमानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील कुठल्याही रुग्णाचे रक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिकृत परवानगी शिवाय खासगी पॅथॉलॉजीमध्ये तपासणीसाठी नेता येत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब, पॅथॉलॉजी तज्ज्ञ व तंत्रज्ञ आहेत. असे असताना बालरोगतज्ज्ञांनी हा प्रकार केला. त्यांनी कुमारी राजनंदिनी जितेंद्र जाधव या बालरुग्णांच्या नातेवाईकाला या कामासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. तिचे काका महेंद्र जाधव यांनी अशी नियमबाह्य़ रक्कम देण्यास नकार दिला. या रुग्ण कक्षातील सर्वच रुग्णांकडून रक्त तपासणीच्या नावाखाली नियमबाह्य़ रकमा उकळण्यात आल्या.  हा सर्व रक्त चाचण्यांचा कंत्राट एका खासगी पॅथॉलॉजीला देण्यात आल्यानंतर या पॅथॉलॉजीचे अप्रशिक्षित तंत्रज्ञ रक्त नमुने घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बालरुग्ण कक्षात गेले. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि लखनभाऊ गाडेकर यांनी रंगेहाथ पकडले. आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रकाराविरुद्ध जिल्हा सामान्य रुग्णालयात उग्र आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिवाजी गजरे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक हिवाळे त्या ठिकाणी हजर झाले. त्यांच्या समक्ष बालरोगतज्ज्ञ डॉ. कोठारी यांनी उकळलेले नियमबाह्य़ पैसे रुग्णांच्या नातेवाईकांना परत करावे लागले. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गजरे यांनी दिले आहेत. या  प्रकारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी, भ्रष्टाचार व गैरकारभार उजागर झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गजरे यांचे रुग्ण सेवेकडे दुर्लक्ष असून ते आर्थिक गैरव्यवहारांना पाठीशी घालत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकाचे रुग्णालयावर अजिबात नियंत्रण नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.