विनयभंगप्रकरणी सश्रम कारावास Print

गडचिरोली / वार्ताहर
शिदोरी घेऊन शेताकडे जाणाऱ्या महिलेवर हल्ला करून विनयभंग केल्याप्रकरणी येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने आरोपीस ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवाय, फिर्यादी महिलेस नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. गडचिरोली तालुक्यातील येवली येथील डंबाजी अर्जुन मेश्राम (४०) असे आरोपीचे नाव आहे. १५ फेब्रुवारीला येवली येथील महिला दुपारी १२ वाजताच्या सुमारास शिदोरी घेऊन आपल्या शेताकडे जात असताना आरोपी देवाजी मेश्राम याने फिर्यादी महिलेस रस्त्यावर अडवून तिच्यावर हल्ला करून विनयभंग केला. याप्रकरणी या महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याआधारे पोलिसांनी आरोपी डंबाजी मेश्राम याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी कुर्वे यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी डंबाजी मेश्रामला ६ महिन्यांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. या दंडातून फिर्यादी महिलेस ४ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावे, असाही आदेश दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विनोद हुकरे यांनी काम पाहिले.