‘खड्डे बुजवा, अन्यथा टोलनाके बंद पाडू’ Print

बुलढाणा / प्रतिनिधी
डोणगांव ते दुसरबीडपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे व रस्ता दुरुस्ती चार दिवसांच्या आत पूर्ण न केल्यास शिवसेनेच्या वतीने टोलनाके बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. नागपूर ते संभाजीनगर हा रस्ता रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे, मात्र मेहकर तालुक्यातील दुसरबीडपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. अशा प्रकारच्या खड्डय़ांमुळे गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मेहकरपासून ८ कि.मी. अंतरावर च्िंाचोलीबोरे फाटय़ाजवळ दोन लक्झरी बसेसचा अपघात होऊन २० प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. तरीसुद्धा रस्ते विकास महामंडळ गांभीर्याने खड्डय़ांकडे व रस्त्याकडे बघत नाही. तेव्हा येत्या चार दिवसांत डोणगांव ते दुसरबीडपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविणे व रस्ता दुरुस्ती न झाल्यास दुसरबीड व मालेगाव या दोन्ही ठिकाणचे टोलनाके बंद पाडण्याचा इशारा आमदार संजय रायमूलकर, उप जिल्हाप्रमुख दिलीप देशमुख, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख विकास जोशी, युवा सेनेचे भूषण घोडे, आशीष रहाटे आदींनी दिला आहे.