‘अदानी’ तील मजुरांचा आंदोलनाचा इशारा Print

गोंदिया / वार्ताहर
तिरोडा येथील अदानी पॉवर प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अनेक बांधकाम कंपन्यांमध्ये हजारो कामगार अतिशय धोकादायक स्थितीत कमी पगारात काम करतात. या कामगारांना नियमानुसार वेतन, कामाचे तास, औषधोपचार, सुरक्षा साधने व इतर आवश्यक बाबी पुरवल्या जात नसल्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्याची तयारी मजुरांनी सुरू केली आहे.
विविध कंपन्यांमधील कामगारांना शासन नियमाप्रमाणे नियमित वेतन व इतर सोयी मिळत नाही. कामगारांचे तास ठरवले नसून त्यांना वेठबिगारांसारखे १२ ते १४ तास राबवले जाते. त्या मोबदल्यात अतिशय कमी मजुरी देऊन त्यांचे आíथक शोषण केले जाते. कामगारांना पगारी एकही साप्ताहिक सुट्टी दिली जात नसून वर्षभर जबरीने काम करवून घेतले जाते. कोणत्याही कामगारांना हजेरी कार्ड दिले जात नाही. एखाद्या कंपनीने हजेरी कार्ड दिले तर दर महिन्याला ते परत घेतले जाते. तसेच त्यावर ‘ओव्हर टाइम’ची नोंदही केली जात नाही. पेट्रॉन कंपनीतील कामगारांना सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत काम करावे लागते. तेथे कामगारांना बोनस दिला जात नाही. कामगारांना वेतन बँक खात्याद्वारे किंवा धनादेशाद्वारे दिले जात नाही. त्यामुळे गरीब कामगारांच्या तुटपुंज्या मजुरीवर दलाल व ठेकेदार हात मारतात.
 शासन नियमाप्रमाणे कामगारांच्या नावे भविष्य निर्वाह निधी कपात करणे आवश्यक आहे. मात्र काही कंपन्या कामगारांच्या नावे भविष्य निर्वाह निधीची कपात करीत नाही. त्यामुळे दिवसाला कामगारांचे ३० रुपये नुकसान होते. कपात केली तरी संबंधित कामगारांची रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केली जात नाही. बहुतांश कामगारांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी क्रमांक व खात्यात जमा असलेल्या रकमेचे वार्षकि विवरणपत्र देण्यात आलेले नाही. दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असताना तीन ते चार वर्षांपासून कामगारांची कोणतीही पगारवाढ न करता एकाच वेतनावर त्यांना राबविले जात आहे. कामगारांना मिळणाऱ्या मजुरीचे दर दर्शविणारे फलकसुद्धा कुठेही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन उभारण्याचा निर्णय येथील मजुरांनी घेतला आहे.