भारत जगाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रेसर -कानन Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद यांनी संधिकाळ संपताच भारत प्रगतिपथावर मार्गक्रमण करेल, असे भाष्य केले होते. त्यानुसार २०११ मध्ये संधिकाळ संपला आहे. आता भारत देश प्रगतिपथावर असून संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रेसर झाला आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह के. सी. कानन यांनी व्यक्त केले.
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर नगरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या सार्ध शती वर्षांनिमित्त येथील बागला कॉन्व्हेंटच्या पटांगणावर आयोजित प्रकट बौद्धिक वर्गात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक प्रा. जयंत खरवडे, जिल्हा संघचालक वसंत थोटे, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले, मोठी सैन्य शक्ती, सुदृढ आर्थिक शक्ती आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण देश अवघ्या जगावर राज्य करू शकतो. या सर्वार्थाने भारत स्वयंपूर्ण असून जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता या देशात आहे. एकीकडे संपूर्ण जगात मंदीकाळाने हाहाकार माजला असताना भारत देश खंबीरपणे उभा राहू शकला. त्याचे कारण या देशाची समाजरचना आहे. भारतातील परिवाराची संकल्पना या देशाचे मोठे बलस्थान आहे. त्याग, चारित्र्य, पराक्रमाची भावना, देशभक्ती, नेतृत्वाची क्षमता असणाऱ्या काही लोकांच्या संघटित शक्तीमुळे अवघे जग जिंकता येऊ शकते, असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला होता. या सर्वगुणांनी युक्त असा नागरिक घडविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करीत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेचा प्रवाह संघात निरंतर वाहतो आहे. त्याग, आध्यात्मिकता, योग, संस्कृती, वेद, उपनिषद आदी विविध अमूल्य अशा गोष्टी या जगाला देण्यासाठी भारताकडे आहेत. कारण, भारताचा इतिहास उज्ज्वल आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होता. स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या सार्ध शती वर्षांनिमित्त आयोजित या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र, त्यांचे विचार आणि त्यांच्या स्वप्नातील भारत के. सी. कण्णन यांनी मांडला.