भाकपच्या ‘जेल भरो’ आंदोलनात शेकडोंना अटक Print

गोंदिया / वार्ताहर
शेतकरी, शेतमजूर, कामगार व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत गोरेगाव येथे भाकपच्या तालुका शाखेतर्फे मोर्चा काढून ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्य़ातील आमगाव, देवरी, सडक अर्जुनी व गोंदिया तालुक्यातून ५२० कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. दरम्यान, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
असंघटित क्षेत्रातील कष्टकरी कामगार व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भाकपचे राष्ट्रीय महासचिव खासदार एस. सुधाकर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली २८ मे रोजी मुंबई मंत्रालयावर ५० हजार कष्टकऱ्यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाकपच्या शिष्टमंडळाला आगामी काळात बठक बोलवून मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप बठक घेण्यासंदर्भात कोणतीही हालचाल झाली नसून, राज्य शासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता आज राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत गोरेगाव तालुका शाखेतर्फे पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले व तालुका सचिव चरणदास भावे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनांतर्गत शेकडो कर्मचारी व कामगारांनी स्वत:ला अटक करवून घेतली.
दरम्यान, पक्षाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केले. दरम्यान, गोंदिया व देवरी येथेही भाकपतर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात चंद्रप्रकाश शेंडे, रायाबाई मारगाये, नत्थूजी पाचे, माधोराव मेर्शाम, लालबावटा शेतमजूर युनियनचे नारायण भलावी, दुलीचंद कावळे, टेकचंद कांबरकर, राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गयाबाई क्षीरसागर, सुनीता वैद्य, घरकामगार संघटनेचे भय्यालाल कटरे, चैतराम दियेवार, सुरेश बिसेन, अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अंजना ठाकरे, सत्यशीला चंद्रिकापुरे, मीना भावे व आशा परिचर संघटनेच्या वीणा गौतम आदी पदाधिकारी, कार्यकत्रे व कामगार सहभागी झाले होते.