एक नाते महानायकाच्या घट्ट मैत्रीचे! Print

चंद्रपूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

एक महानायक तर दुसरा चित्रकार.. या दोघांना 'कलावंत' या एका शब्दाने ऋणानुबंधांच्या धाग्यात विणले आहे. अर्थात ही गोष्ट आहे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व चित्रकार चंदू पाठक यांची. आज अभिताभच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या मैत्रीला पुन्हा एकदा उजाळा देण्यात येत आहे. अमिताभ यांच्या सत्तरीचे निमित्त साधून पाठक यांनी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत असलेले चंदू पाठक प्रसिध्द चित्रकार आहेत. चित्रकार म्हणून पाठक मोठे असले तरी ते महानायक अमिताभ बच्चन यांचे सर्वात मोठे फॅन्स आहेत. यातूनच बच्चन व पाठक यांच्यात एक अनामिक मैत्रीचे नाते विणले गेले आहे. अमिताभ बच्चन यांच्या पहिल्यावहिल्या सात हिंदूस्थानी पासून तर आजच्या 'बुढा होगा तेरा बाप' हे सर्व चित्रपट पाठक यांनी पाहिले आहेत. नुसते चित्रपटच पाहिले नाही तर अमिताभ यांच्या या सर्व चित्रपटातील भूमिकांच्या कलावृती त्यांनी चित्रांच्या माध्यमातून साकारलेल्या आहेत. कुली चित्रपटाच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. तेव्हा पाठक यांनी सलग महिनाभर येथील महाकाली व अंचलेश्वर मंदिरात पूजा केली होती. एवढेच नाही तर या अपघातातून बच्चन सुखरूप बचावल्यानंतर त्यांनी मित्रांसोबत आनंदही साजरा केला होता. गेल्या काही वर्षांपासून ही मैत्री आणखीच दृढ झालेली आहे. या दोन कलावंतांची मैत्री ऋणानुबंधाच्या धाग्यात विणली गेली आहे. मागील काही वर्षांपासून पाठक बच्चन यांची त्यांच्या मुंबई स्थित ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर भेट घेत आहेत. दोन वर्षांपूर्वीही पाठक यांनी बच्चन यांची भेट घेवून अमिताभ बच्चन यांचे पोर्टेड त्यांना भेट स्वरूपात दिले होते. पाठक यांची चित्रकला बघून अमिताभ अक्षरश: भारावून गेले. पाठक यांनी भेटस्वरूपात दिलेल्या सर्व कलाकृती अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यातील आर्ट गॅलरीत लावण्यात आलेल्या आहेत. आज अमिताभ बच्चन सत्तरावा वाढदिवस साजरा करित असतांना पाठक यांनी पून्हा एकदा मैत्रीखातर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सुखद प्रसंगाचे औचित्य साधून चंदू पाठक व मित्रपरिवारातर्फे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता जुनोना चौकात असलेल्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊ देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे राहतील. याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे संचालक विश्वास लहामगे, प्रा. जयश्री कापसे-गावंडे   उपस्थित राहणार आहेत.