अर्जुनी मोरगाव तालुक्यात गॅस्ट्रो व डायरियाची लागण Print

गोंदिया / वार्ताहर
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या तिडका-करड येथे गॅस्ट्रो व डायरियाची लागण झाल्याने शेकडो लोक आजारी असून त्यांच्यावर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल तिडका ग्रामपंचायतीत कॅम्प लावण्यात आला असून तेथे १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून तिडका येथे गॅस्ट्रो व डायरियाची लागण झाली आहे, मात्र आरोग्यसेवक सानप यांचा गावात थांगपत्ता नाही. उपसरपंच आसाराम मेश्राम यांनी याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गुज्जनवार यांना दिली. त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकारी राऊत व डॉ. एम.डी. रामटेके यांच्यासह गाव गाठले. दरम्यान, पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी गावातील पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गुरुवारी तिडका ग्रामपंचायतीत विशेष कॅम्प लावून डायरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे तसेच अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. तसेच काहींना डायरियाची लागण झाल्याची माहिती आहे. विशेष असे की, वेळीच उपचार सुरू झाले नसते तर परिस्थिती भयावह झाली असती. दरम्यान, तिडका येथे डॉ. संजय गुज्जनवार, डॉ. राऊत, डॉ. एम. रामटेके व त्यांची चमू परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.